भारतीय कला-संस्कृतीचे होणार दर्शन,शिवाजी महाराजांच्या पर्यावरणप्रेमी विचारांचा जागर पंचमहाभुतांची मिळणार माहिती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंचगंगेची महाआरती
कोल्हापूर ; श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती दिनी १९ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात भव्य आणि दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचमहाभुतांची माहिती देण्याबरोबरच युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यावरणप्रेमी विचारांचा जागर या निमित्ताने करण्यात येणार आहे. देशाच्या विविध प्रांतातील कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारे चित्ररथ, कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत. प्रजासत्ताकदिनी दिल्ली संचलनात सहभागी झालेले महाराष्ट्राचे चित्ररथ या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचा समारोप व पंचगंगा नदीची महाआरती होणार आहे.
पर्यावरणजागृतीसाठी कणेरी मठावर पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली रोज हजारो हात यासाठी राबत आहेत. २० फेब्रुवारी रोजी सकाळी या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. त्यापूर्वी १९ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. मठाच्या पुढाकाराने शहरातील सर्व तरूण मंडळ, तालीम मंडळांच्या सहभागाने काढण्यात येणाऱ्या या शोभायात्रेची सुरूवात दसरा चौक येथून करण्यात येणार आहे. चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयाला अभिवादन करून ही शोभायात्रा सुरू होईल. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर आणि करवीरकर जनता सहभागी होईल.
अतिशय भव्य आणि दिव्य अशा वातावरणात निघणाऱ्या या शोभायात्रेत पंचमहाभुतांची माहिती देण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यावरण आणि वैज्ञानिक विचारांचा जागर करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील संचलनामध्ये दुसरा क्रमांक मिळविलेले महाराष्ट्राचे चित्ररथ हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. याशिवाय देशातील विविध राज्यातील सुमारे शंभर पथकांकडून त्या त्या प्रांतातील कला, क्रीडा, संस्कृतीचे दर्शन होणार आहे. ढोल, ताशा, हलगी, लेझीम, झांजपथक या पारंपारिक वाद्याबरोबरच विविध राज्यातील अनेक वाद्य प्रकार यामध्ये असतील. विविध वेषभुषेतील हजारावर कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळाही यामध्ये सहभागी होणार असून पर्यावरण वाचविण्याची हाक या निमित्ताने दिली जाणार आहे.
शहरातील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध रित्या फिरून ही शोभायात्रा पंचगंगा नदी घाटावर येईल. तेथे त्याचा समारोप होईल. तेथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पंचगंगेची महाआरती होईल. या यात्रेच्या तयारीसाठी नुकतीच प्रशासकीय अधिकाऱ्यांची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली. त्यामध्ये ही यात्रा यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले.
या शोभायात्रेबाबत अधिक माहिती देताना संयोजन समितीचे सदस्य शंकर पाटील यांनी सांगितले की, कोल्हापुरात प्रथमच अतिशय भव्य अशी ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सर्व तरूण मंडळ आणि तालीम मंडळांनी सहभागी होण्यास मान्यता दिल्याने त्याची भव्यता वाढणार आहे. या निमित्ताने शिवजयंतील ऐक्याचा नवा संदेश मिळणार आहे.
