कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना निमंत्रित करण्यात आल्यानंतर रोष दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून आज राज्यपालांच्या दौऱ्याला कडाडून विरोध करत आज जेलभरो आंदोलन केले. शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठात राज्यपालांना आमंत्रित करू नये, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ राज्यपाल कोश्यारी आणि भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत होत आहे.
राज्यपालांनी महाराष्ट्रात आल्यानंतर राज्याचे प्रतीक असलेल्या महापुरुषांवर सातत्याने बेताल वक्तव्ये केल्याने संतप्त भावना आहेत. त्यामुळे राज्यपालांविरोधात शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. ज्या विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठात अपमान करणाऱ्या राज्यपालांना आमंत्रित करू नये, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. कोल्हापुरात आल्यास कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.
माफी मागून कोल्हापुरात या, शिवसेनेची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार पवार म्हणाले की, राज्यपालांनी पहिल्यांदा माफी मागून मगच कोल्हापुरात यावे. त्यांनी जाणूनबुजून आमच्या दैवतांचा अपमान केला आहे. विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठ आहे, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा माफी मागावी आणि मग कोल्हापुरात यावे. अशा लोकांना बोलावण्याचे तुम्ही धाडस कसे काय करता? अशी विचारणाही त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला केली. या राज्यपालांना आमचा विरोध कायम राहणार आहे.
शिवसेनेकडून कुलगुरुंना निवेदन -शिवसेनेकडून विविध माध्यमातून राज्यपालांच्या कोल्हापूर दौऱ्याला प्रखर विरोध सुरु आहे. जेलभरो आंदोलन करण्यापूर्वी शिवसेनेकडून शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुंनाही निवेदन देण्यात आलं आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास त्यांना निमंत्रित करून विद्यापीठ प्रशासनाने कोल्हापूरच्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ते जनता कदापी सहन करणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शिवाजी विद्यापीठाचा 16 फेब्रुवारीला दीक्षांत समारंभ
दरम्यान, शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या समारंभाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शनिवारी (ता.04) झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. यामध्ये व्यवस्थापन परिषदेवरील नूतन सदस्य उपस्थित होते.
