सावर्डे बुद्रुकमध्ये पाच कोटीच्या जलजीवन योजनेचा भूमिपूजन समारंभ
सावर्डे बुद्रुक, दि. १२:महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यावधींचा निधी खेचून आणला. परंतु; सहा महिन्यापूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर बिळात लपून बसलेले बाहेर पडले आहेत. ते काहीही संबंध नसताना सगळी कामे आम्हीच मंजूर केली आहेत असे सांगत विकास कामांचा श्रेयवाद रंगवत आहेत, असा जोरदार टोला आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी लगावला.
सावर्डे बुद्रुक ता. कागल येथे पाच कोटी रुपये निधीच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार श्री. मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक उपस्थित होते.
भाषणात आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, कोणतेही संविधानिक पद नसलेले किंबहुना ग्रामपंचायतीला साधे सदस्य म्हणूनसुद्धा निवडून न आलेले आम्ही आणलेल्या विकास कामाच्या प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क सांगत आहेत, हे आश्चर्यकारक आहे.
माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, मिळालेली सत्ता ही जनतेची असते या भावनेने आमदार श्री. मुश्रीफ यांनी सत्तेचा अंश आणि अंश गोरगरिबांच्या सेवेसाठी वापरला.
ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक म्हणाले, या तालुक्याला दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि अलीकडच्या काळात आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांची विकासाची परंपरा आहे. कागल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सगळे एक होऊन काम करूया.यावेळी कृष्णात शिरसे यांचेही मनोगत झाले.
“सगळं मीच केलं………”
कुणाचेही नाव न घेता माजी आमदार श्री. घाटगे यांनी एक जबरदस्त उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले, देशात गुंतवणुकीसाठी परदेशी कंपन्या येत असतात. देशातील बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळेल या भावनेने सरकार त्यांच्याशी करार करीत असते. अशी एखादी दहा- वीस हजार नोकऱ्या मिळणारी कंपनी सांगा. तीही मीच आणली आणि मीच नोकऱ्या लावल्या असे म्हणणार, अशी टीकाही त्यांनी केली. त्यांच्या या टीकेला उपस्थित ग्रामस्थांनी हास्याच्या गडगडात आणि टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
माजी सरपंच डॉ. इंद्रजित पाटील, माजी सरपंच शंकर जाधव, माजी सरपंच डॉ. संजय चिंदगे, माजी सरपंच रघुनाथ सिरसे, कृष्णात शिरसे, उपसरपंच सागर सावर्डेकर, ग्रामपंचायत सदस्य विनोद कांबळे, पांडुरंग काशीद, विलास अस्वले, सौ. शीतल हिरुगडे, मालुताई चिंदगे, पी. डी. हिरुगडे, रफिक इनामदार, सखाराम पाटील, आनंदा म्हतूगडे, शिवाजी निकम, बाबुराव पाटील, राजू इनामदार, पांडुरंग बुजरे, इंद्रजित हिरुगडे, तानाजी सावर्डेकर, संभाजी चव्हाण, किरण घराळ, बी. एम. म्हातुगडे, संदीप पाटील, सागर म्हतूगडे, संभाजी संदूगाडे, महादेव अस्वले, बंडा पाटील, पप्पू कांबळे, पांडुरंग मेंगाने, निसार इनामदार, बाळासो पताडे, आनंदा पाटोळे, ज्ञानदेव परीट, जहांगीर मुल्लानी, सागर पाटील, सात्तापा पाटील, निलेश माने आदी उपस्थित होते.स्वागत उपसरपंच सागर सावर्डेकर यांनी केले. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य विनोद कांबळे यांनी केले.
