उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापनेच्या मागणीबद्दल कृतज्ञता
लिंगायत समाजाच्या बेरोजगार तरुणांना रोजगार, उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करा व अनुदान देण्याची केली मागणी
गडहिंग्लज, दि. ६:गडहिंग्लजमध्ये समस्त लिंगायत समाजाच्यावतीने आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार झाला. आमदार श्री. मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लिंगायत समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार, उद्योग, व्यवसाय ऊभारणीसाठी महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करा, अशी मागणी केली आहे. या महामंडळाकडून बिनव्याजी कर्जपुरवठा व्हावा व अनुदान मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सत्काराला उत्तर देताना आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र राज्य सरकारच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या मागणीचा विचार होऊन अर्थसंकल्पामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा घोषणा व तरतूद व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे.
ते पुढे म्हणाले विविध समाजातील बेरोजगार युवक- युवतींच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी विविध आर्थिक विकास महामंडळे कार्यरत आहेत. मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. इतर मागासवर्गीयांसाठी ओबीसी आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. मातंग समाजासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. मागासवर्गीय समाजासाठी महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. भटक्या व विमुक्त जाती जमातींसाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. या आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर लिंगायत समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार, उद्योग व व्यवसाय निर्मितीसाठी महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.
“रुद्र भूमीसाठी तात्काळ १५ लाखांचा निधी……
समस्त लिंगायत समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार श्री. मुश्रीफ यांच्याकडे लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी म्हणजेच रुद्र भूमीसाठी निधीची मागणी केली. आमदार श्री. मुश्रीफ यांनी तात्काळ गडहिंग्लज नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन १५ लाख रुपये निधीचा प्रस्ताव स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत देण्याची सूचना केली.
यावेळी किरण कदम, हारुण सय्यद, सुरेश कोळकी, सतीश पाटील, लिंगायत समाजाचे अध्यक्ष राजशेखर दड्डी, अमरनाथ घुगरी, बाळासाहेब घुगरी, अरुण बेल्लद, विजय बनगे, गुंडेराव पाटील, डाॅ. मल्लाप्पा बेळगुद्री, राजशेखर येरटे आदी प्रमुख उपस्थित होते.