माद्याळमध्ये विविध विकासकामांच्या लोकार्पण व शुभारंभासह बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप
माद्याळ, दि. १३:मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत १५ ऑगस्टला माता- भगिनींच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करून माता- भगिनींना रक्षाबंधनाची भेट देणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यानी केले.
माद्याळ (ता. कागल) येथे बांधकाम कामगारांना भांडी वाटप व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पालकमंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. मेळाव्याचे अध्यक्ष माजी सरपंच मारुतीराव चोथे होते. कार्यक्रमात चिकोत्रा खोऱ्यातील ४०० बांधकाम कामगारांना नामदार श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते भांडी संच वितरण करण्यात आले.
यावेळी भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सरकारने सर्वसामान्य, गरीब व कष्टकरी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना अमंलात आणल्या. मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण हि योजना महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी असून या योजनेचा लाभ सर्व माता-भगिनींनी घ्यावा. स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविकांनी यासाठी कार्यरत राहून महिलांना मदत करावी.
स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात कागल तालुका सहकारी खरेदी -विक्री संघाचे संचालक सुर्याजी घोरपडे म्हणाले, कागल तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून हसन मुश्रीफ साहेबांच्याकडे जी – जी पदे आली त्या सर्व पदांचा वापर त्यांनी सर्वसामान्य माणसाला लाभ मिळवून देण्यासाठीच केला. पक्ष , गट -तट न पाहता श्री. मुश्रीफसाहेबांनी आजपर्यंत सामान्य माणसाच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. ज्या -ज्या योजना राबवल्या त्या सर्व योजना या राज्यातील सामान्यातल्या सामान्य माणसासाठीच आणल्या.
यावेळी मारुतीराव चोथे, जे.डी. मुसळे , सरपंच बंडू सुतार, अरुण खोत, संताजी चौगुले, महादेव रानमाळे, आनंदा चव्हाण, वसंतराव मेतके, हिराजीत पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य आदीसह ग्रामस्थ व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.