कोल्हापूर/प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाच्या विभागप्रमुख व रशियन भाषेच्या सहायक प्राध्यापक डॉ. मेघा पानसरे यांना रशियन सांस्कृतिक केंद्र, तिरुवनंतपुरम व शासकीय इसेनिन म्युझियम, मॉस्को या संस्थांच्या वतीने ‘सिर्गेइ इसेनिन पुरस्कार – २०१९’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिरुवनंतपुरम येथे रशियन दूतावासातर्फे आयोजित ‘रशियन भाषा व साहित्य महोत्सवा’त डॉ. पानसरे यांना सन्मानित करण्यात आला.
रशियन भाषा व साहित्य लोकप्रिय करण्यात त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल एका भव्य कार्यक्रमात महान रशियन कवी सिर्गेइ इसेनिन यांची अर्ध-मूर्ति, प्रमाणपत्र व पदक या स्वरूपात हा सन्मान झाला. डॉ. मेघा पानसरे यांचे रशिया व रशियन संस्कृती संबंधी लेखन, साहित्यिक भाषांतर, रशियन साहित्यिक भाषांतर या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन रशियन भाषा व साहित्य अध्यापन या कार्याची दखल घेऊन त्यांची ‘सिर्गेइ इसेनिन’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
‘सिर्गेइ इसेनिन पुरस्कार – २०१९’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. मेघा पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले. हा पुरस्कार म्हणजे तीस वर्षांच्या या क्षेत्रातील कामाचा सन्मान आहे. रशियन भाषा अध्यापन व साहित्यिक भाषांतर यातून एका नव्या भाषेच्या कौशल्याबरोबरच एका नव्या संस्कृतीची ओळख होते. ‘विवेकी विचार, बहुभाषिकता व बहुसांस्कृतिकतेचा आदर’ हे मूल्य रुजवले जाते, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सिर्गेइ इसेनिन यांच्या कवितांच्या मराठी अनुवादाचा संग्रह प्रकाशित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली येथील रशियन दूतावासाच्या अंतर्गत असलेले केरळ विधानसभेचे अध्यक्ष श्री. पी. श्रीरामकृष्णन यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. भारत व रशियातील मैत्रीपूर्ण संबंध काळाच्या कसोटीला उतरले आहेत. हे परस्पर संबंध दृढ होण्याच्या प्रक्रियेत भाषा व साहित्य यांनी उत्प्रेरक म्हणून भूमिका बजावली आहे. लोकप्रिय रशियन साहित्यिकांच्या लेखनाच्या भाषांतरातून जगभर रशियन संस्कृतीचा परिचय झाला, असे ते म्हणाले.
याप्रसंगी तिरुवनंतपुरमचे महापौर श्री. के. श्रीकुमार, तसेच केरळचे मुख्य सचिव श्री. टॉम जोस यांनीही मनोगत व्यक्त केले. रशियन दूतावासाच्या ‘रशियन विज्ञान व संस्कृती केंद्र’, नवी दिल्ली या संस्थेचे संचालक व ‘रुसोत्रुद्नीचेस्त्वो’ या संस्थेचे भारतातील मुख्य प्रतिनिधी श्री. फ्योदर राझोव्स्की यांनी पुढील वर्षी महान देशभक्तीपूर्ण युद्धातील विजयाच्या ७५व्या स्मृतिदिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले. रशियाचे मानद राजदूत व रशियन संस्कृती केंद्र, तिरुवनंतपुरमचे संचालक श्री. रतीश नायर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी रशियन दूतावासाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख तत्याना पिरोवा या उपस्थित होत्या.
मल्याळी भाषेतील लेखक, अभिनेते, गायक, रंगकर्मी, ज्येष्ठ पत्रकार, उच्च प्रशासकीय अधिकारी अशा सर्व स्तरांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.