कोल्हापूर/प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मिणचे व इचलकरंजी येथे छापा टाकून दोन चार चाकी वाहनासह बनावटरित्या तयार केलेल्या विदेशी मद्याचे एकूण 20 बॉक्स व दोन मोबाईल असा एकूण 4 लाख 29 हजार 480 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात राहुल रवींद्र शिंदे, (व. २९, रा. इचलकरंजी), अनिस सलीम म्हालदार (व. ३२ रा. सुतार माळ, इचलकरंजी) अरुण शेवाळे (वय ३४५ रा. घोडकेनगर, इचलकरंजी) व रवींद्र शेलार (वय ४१ शेळकेनगर, इचलकरंजी) या चौघाजणांना अटक केली.
राज्य उत्पादन शुल्क जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले पेठवडगाव मार्वगावरुन काही इसम हे नॅनो कार (क्रमांक एम एच-०९-बी एक्स-५९३८) मधून बनावटरित्या तयार केलेल्या विदेशी मद्याच्या बॉक्सची वाहतूक करणार असल्याची गुप्त बातमी मिळाली. या मार्गावर पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवली होती. आज सकाळी सव्वा सात वाजता नॅनो वाहन हातकणंगलेकडून पेठवडगावच्या दिशेने जात असल्याचे पथकातील सावर्डे येथे थांबलेल्या कर्मचाऱ्यांना दिसले. पथकातील अधिकाऱ्यांनी नॅनो कारला थांबण्याचा इशारा करुन कारची तपासणी केली असता मागच्या शीटवर प्रवरा नं.०१ व जी.एम. ब्रुवरीज लिमीटेड असे लिहलेले देशी दारुसाठी वापरण्यात येत असलेले खाकी पुठ्यांचे सहा बॉक्स दिसून आले. बॉक्समध्ये मॅकडॉल नं.०१, डीएसपी व्हिस्की, बॅगपायपर व्हिस्की या ब्रँडच्या १८० मिलीच्या विदेशी मद्याने भरलेल्या सिलबंद बाटल्या असल्याचे आढळून आले. बाटल्यांची तपासणी केली असता प्रथमदर्शनी बाटल्यावरील लेबल व बुचे बनावटरित्या तयार केल्याचे दिसून आले.
वाहनात असलेले राहुल रवींद्र शिंदे, (व. २९, रा. इचलकरंजी) अनिस सलीम म्हालदार (व. ३२ रा. सुतार माळ, इचलकरंजी) यांना अटक करण्यात आली आहे. अनिस सलीम म्हालदार यांच्या सुतार माळ, इचलकरंजी येथे तपास केला असता विदेशी मद्याच्या १४ बॉक्स मिळून आले. बनावट मद्यसाठा इचलकरंजी येथील अरुण शेवाळे व त्याचा साक्षीदार रवींद्र शेलार या दोघांनी त्यांच्याकडील टाटा कंपनीच्या इंडीगो मांझा कारमधून दिलयाचे सांगण्यात आले. घोडकेनगर व शेळकेभवन, इचलकरंजी येथे राहत्या घरी अरुण शेवाळे (वय ३४५ रा. घोडकेनगर, इचलकरंजी) व रवींद्र शेलार (वय ४१ शेळकेनगर, इचलकरंजी) यांना अटक करुन तसेच गुन्ह्यात वापरलेली इंडीगो मांझा (क्र. एम एच-२८-डब्ल्यू-३५१३) ही कार जप्त केली.
आगामी नाताळ सण व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे आरोग्यास हानीकारक बनावट मद्य तसेच परराज्यातील मद्य अवैद्यरित्या विक्री होण्याची शक्यात असल्याने नागरिकांनी सतर्क राहून अशा प्रकारची माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक गणेश पाटील यांनी केले आहे.
राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाचे कोल्हापूरचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील व किशोर नडे, जवान संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे, रंजना पिसे यांनी यांनी कारवाई केली.
