कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) : गेल्या वर्षी जिल्ह्यात आलेल्या महापुराचा अनुभव लक्षात घेवून या 15 जूनपासून कोल्हापूरसाठी एक, शिरोळसाठी एक आणि राजापूर, राजापूरवाडी टाकळी या गावांसाठी एक अशा तीन ठिकाणी एनडीआरएफची तीन पथके दक्षता म्हणून तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, या प्रत्येक पथकासोबत 5 बोटी, लाईफ जॅकेट आणि जवान असणार आहेत. जिल्ह्यामध्ये 17 बोटी असून आणखी 25 बोटी आणि 250 लाईफ जॅकेट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातील 9 रेस्क्यू फोर्समध्ये 900 प्रशिक्षित आपदा मित्र आहेत. यासर्वांना त्या त्या गावांमध्ये तैनात करण्यात येणार आहे. बोट चालवणे असेल तसेच नागरिकांना स्थलांतरित करण्याची कार्यवाही असेल या आपदा मित्रांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
एफएम बेस कम्युनिकेशन आणि हॅम रेडिओ
व्हॉट्सॲप तसेच दूरध्वनीवरुन गावातून स्थलांतरित होण्याबाबत संदेश द्यावा लागतो, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, यासाठी एफएम बेस कम्युनिकेशन यंत्रणा करण्याचे नियोजित आहे. त्याचबरोबर हॅम रेडिओची निर्मिती करण्याचे नियोजित आहे. यामाध्यमातून गावा गावांमध्ये थेट संदेश पोहचवता येईल. यासाठी तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनातून केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे काम सुरु आहे. केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाल्यावर एफएम स्टेशन आणि स्टुडिओ उभारण्यात येईल. पहिल्या टप्यात पूरबाधित गावं आणि दुसऱ्या टप्यात जिल्ह्यातील सर्व गावे या कम्युनिकेशन यंत्रणेला जोडण्यात येईल, याबाबत नियोजन सुरु आहे. यामाध्यमातून जिल्हास्तरावरुन तसेच तालुका स्तरावरुन एकाच वेळी संदेश पोहचवून करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबतही मार्गदर्शन करणं शक्य होणार आहे.
जिल्हास्तर, तालुकास्तर आणि ग्रामस्तरावर नियोजन
मागील वर्षीचा अनुभव पाहता यावर्षी अधिक दक्ष राहून जिल्हास्तर, तालुकास्तर आणि ग्रामस्तरावर नियोजन सुरु आहे. जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर बैठका घेण्यात आलेल्या आहेत. ग्रामस्तरावर पूरबाधित गावांमध्ये लोक प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासन यांच्या बैठका सुरु आहेत. यामध्ये तीन टप्यात नियोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्यात दरवर्षी पूर येतो अशा काही गावांचा समावेश असेल. दुसऱ्या टप्यात पाऊस जास्त झाल्यामुळे किंवा धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे बाधित झालेली गावे आणि तीसऱ्या टप्यात गेल्या वर्षीचा बेंच मार्क गृहित धरुन बाधित झालेली गावे. अशा तीन टप्यात नियोजन सुरु आहे.
या प्रत्येक टप्यामध्ये बाधित जी कुटुंबे असतील, बाधित जी लोकसंख्या असेल ती गणना करुन ज्या व्यक्तींची पर्यायी ठिकाणी रहायची व्यवस्था असेल, अशी माहिती नियोजनात समाविष्ट करीत आहे. पर्यायी व्यवस्था नसणाऱ्या उर्वरित लोकांसाठी तसेच जनावरांसाठी गाव निहाय आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. हा आराखडा तयार करत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा तसेच मंगल कार्यालये घेतली आहेत ती सोडून त्या व्यतिरिक्त मोठी महाविद्यालये, उद्योगांचे गोदामे अशी ठिकाणे तपासण्याचे काम सुरु आहे. गावापासून लांब असणाऱ्या ठिकाणी वाहतूक सुविधाही आराखड्यामध्ये करण्यात येणार आहे.
स्थलांतरित होणाऱ्या लोकांसाठी निवारागृहे आणि तेथील आवश्यक सुविधा अन्न, पाणी, वैद्यकीय मदत तसेच जनावरांसाठी चारा, लहान मुलांसाठी विशेष सोय, महिलांसाठीही सुविधा या प्रत्येक गोष्टींचा विचार करुन गाव आणि तालुकास्तरावर नियोजन सुरु आहे. आराखडा तयार करण्याचे काम सुरु असून लवकरच तहसिलदार आणि प्रांत यांच्यासोबत बैठक घेवून याला अंतिम स्वरुप दिले जाईल, असेही ते म्हणाले.