कोल्हापूर ता.28 :- महाराणा प्रताप चौक येथील के.पी.सी हॉस्पीटलला कोव्हीड- 19 रुग्णांची बिले लेखाधिकारी यांच्याकडून तपासून न घेता बिले परस्पर भरुन घेऊन नंतर तपासणीसाठी सादर केलेबद्दल के.पी.सी हॉस्पीटलला आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शहरातली खाजगी रुग्णालयासाठी कोव्हीड-19 रुग्णांच्या बिलाचे दर शासनाने नियंत्रीत केलेले आहेत. कोव्हीड-19 रुग्णांची बिले रुग्णांना डिसचार्ज देणेपुर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या दि.1 ऑगस्ट 2020 च्या व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या दि.19 ऑगस्ट 2020 च्या आदेशानुसार नियुक्त केलेल्या लेखाधिकारी यांच्याकडून तपासून घेऊन रुग्णांकडून रक्कम स्विकारायची आहे. परंतू के.पी.सी हॉस्पीटलने कोव्हीड रुग्णांची बिलाची देयके महापालिकेचे लेखाधिकारी मिलींद पाटील यांच्याकडून रुग्णांना डिसचार्ज देणेपुर्वी तपासून न घेता डिसचार्ज दिल्यानंतर व रुग्णांकडून रक्कम स्विकारले नंतर तपासणीसाठी सादर केली जात होती. तसेच पीपीई किट्रस व मास्क यांची जादा दराने आकारणी केली जात असलेचे निदर्शनास आले आहे. याबाबत वेळोवेळी के.पी.सी हॉस्पीटलला लेखाधिकारी यांनी निर्देश दिलेले होते. यामध्ये त्यांनी कोणतीही सुधारणा न केलेने आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज कायदयातील तरतुदी नुसार के.पी.सी हॉस्पीटला कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा दोन दिवसात करणेबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तरी शहरातील खाजगी हॉस्पीटल धारकानी शासनाने निश्चीत केलेल्या दरानुसार बिल आकारणी करावी. रुग्णांना डिसचार्ज देणेपुर्वी बिल नियुक्त केलेल्या लेखाधिकारी मार्फत तपासणी करून घेऊन मगच रक्कम भरुन घ्यावी अन्यथा संबधीत हॉस्पीटलवर कारवाई करण्यात येईल. तसेच शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकानी कोव्हीड रुग्णांची बिल भरणेपुर्वी ते लेखाधिकारी यांच्याकडून तपासून न घेता संबधीत हॉस्पीटलने भरण्यासाठी तगादा लावल्यास महापालिकेच्या वॉर रुम फोन.क्र. 0231 ʊ 2542601 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.