“नाना पाटेकर मोठा माणूस, आम्हा गरीब लोकांना तो कसा भेटेल? “या श्रीमती पुष्पा कुलकर्णी यांनी भाबडा प्रश्न उपस्थित करत आपल्यावर व विकलांग मुलावर गुदरललेली परिस्तिथी मिरर कोल्हापूरकडे मांडली त्यावेळी श्रीमती कुलकर्णी यांना गहिवरून आले होते.
यावेळी मिरर कोल्हापूरचे संपादक सतीश वणिरे यानी, प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यापर्यंत कुलकर्णी कुटुंबीयांची व्यथा, दारुण परिस्थितीची माहिती पोचवण्याची ग्वाही दिली होती. याबाबतची माहिती मिरर कोल्हापूरवर प्रसारित केली होती. या बातमी दखल सावली केअरनेही घेतली आणि तात्काळ शेखर कुलकर्णी यास उपचारासाठी दाखल करुन घेतले. बातमीची दखल अभिनेते नाना पाटेकर यांच्या पर्यंतही पोहचलीच. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी समाजमन या संस्थेचे महेश गावडे यांच्या मोबाईलवर स्वतः संपर्क साधला. यावेळी नाना पाटेकर यांनी विकलांग शेखर कुलकर्णी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच शेखर यांच्या पुढील ऑपरेशनसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. याचबरोबर कोल्हापूर मध्ये त्यांच्या नाम फाउंडेशनचे कामकाज पाहणारे श्री. चारुदत्त जोशी यांच्याकडे शेखर कुलकर्णी यांच्या ऑपरेशन साठी येणाऱ्या खर्चाचे कोटेशन, बँक अकाउंट नंबर व अन्य माहिती देण्यास सांगितली. त्या नुसार श्री.गावडे यांनी श्री. चारुदत्त जोशी यांना माहिती दिली आहे.