जिल्हा परिषद प्रांगणात यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण
सदस्यांनी चव्हाण साहेबांचा आदर्श घेऊन काम करावे- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : यशवंतराव चव्हाण साहेबांना सामान्य माणसाप्रती आस्था होती. देशाचे परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या चव्हाण साहेबांच्या पश्चात पुस्तके, ग्रंथ ही त्यांची एकमेव संपत्ती होती. पुतळा पहिल्यावर सामान्य माणसाला दिलासा आणि भरवसा मिळेल. त्याच बरोबरच सदस्य, अधिकारी यांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले. तसेच अध्यक्षस्थानावरुन बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी चव्हाण साहेबांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेऊन काम करावे, असे सांगितले
जिल्हा परिषद प्रांगणामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे प्रदान केलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण, चौथा मजला बांधकामाचा शुभारंभ खासदार श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यानंतर पोलीस क्रीडांगणावर 39 रुग्ण वाहिकांचे लोकार्पण, दिव्यांगांना सानुग्रह अनुदान वितरण, राजर्षी शाहू पुरस्कार वितरण तसेच आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराचे वितरण झाले. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री अरुण लाड, जयंत आसगावकर, प्रकाश आवाडे, पी.एन. पाटील, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, चंद्रकांत जाधव, राजू आवळे, ऋतुराज पाटील उपस्थित होते.
खासदार श्री. पवार म्हणाले, सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या चव्हाण साहेबांचे काम हिमालयाएवढे मोठे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण झाले तरच विकासाची फळे राज्यातील सामान्य लोकांना मिळतील या उद्देशाने पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. केंद्रीत सत्ता केंव्हाही भ्रष्ट होते यासाठीच अनेक लोकांच्या हातात सत्ता असावी यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करुन पंचायत राज मधील सदस्यांना अधिकार देण्याचे महत्तम कार्य त्यांच्या काळात झाले. यातूनच राज्यातील पंचायत राज व्यवस्था बळकट झाल्या. जे काम अयोग्य आहे त्याला नाही म्हणायला शिका, जे योग्य आहे त्याला होय म्हणा ही भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे, असे खासदार श्री. पवार यावेळी म्हणाले.
देशात महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा ठसा यशवंतराव चव्हाण साहेबांनी उमठविला असल्याचे सांगून खासदार श्री. पवार म्हणाले, देशातच नाही तर देशाबाहेरही त्यांचे नाव ऐकायला मिळते. राज्याच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ चव्हाण साहेबांच्या कार्यकाळात रोवली गेली. औद्योगिक वसाहती निर्माण झाल्याने रोजगार निर्मिती होऊन महाराष्ट्राचा विकासामध्ये चेहरा-मोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले असल्याचे श्री.पवार यांनी यावेळी सांगितले. नेतृत्वाची खाण शोधून संपूर्ण राज्यात नेतृत्वाची फळी निर्माण केल्याचे सांगून यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 1960 साली नव्या राज्याचे नेतृत्व करताना चव्हाण साहेबांनी पंचायत राज्याचा पाया घातला. विकासाची घडी बसवली. याच विचारावर राज्य पुढे जात आहे. त्याला घटनात्मक स्वरुप आले. त्याची आठवण नव्या पिढीला व्हावी आणि ती पुतळ्याच्या माध्यमातून निश्चितपणे होईल. देशाला दिशा देणाऱ्या त्यांच्या जीवनाचे अनुकरण आपण सर्वांनी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, इतिहासाचे नवीन पान आज उलघडले आहे. पुतळ्याच्या माध्यमातून तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, त्यांच्या कार्याचा वारसा आणि वसा पुढे घेऊन जाण्याचा उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तींना थेट खात्यात अनुदान देणारी कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात एकमेव असेल. कोरोनाच्या काळात रेमडिसिव्हीर मोफत देण्याचा निर्णय जिल्ह्याने घेतला, असे सांगून कोल्हापूर ते पुणे हायवेला लागून रेल्वे मार्ग व्हावा यासाठी पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले, चव्हाण साहेबांनी वैचारिक पाया मजबूत करण्याचे काम केले. राज्याचा सुवर्ण कलश आणणाऱ्या चव्हाण साहेबांचा भविष्य काळाचा विशाला दृष्टिकोन होता. सत्ता विकेंद्रीत असावी ही भूमिका स्वीकारुन व्यापक स्वरुपात पंचायत राज सुरु केले. देशातील इतर राज्यात या पद्धतीने कार्यक्षमतेने काम होतेय हे सापडणार नाही. बहुजन समाजाला ताकद देण्याचे काम त्यांनी कृतीतून केले आहे.
अध्यक्षीय भाषणात ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, पंचायत राज च्या माध्यमातून ग्रामीण भागातील सदस्यांनी चांगले काम केले तर पंचायत राज नेते घडविणाऱ्या कार्यशाळा होतील असा उल्लेख चव्हाण साहेबांनी आपल्या भाषणात केला होता. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे ही त्यांची भावना होती. चव्हाण साहेबांच्या पश्चात त्यांच्या बँक खात्यावर अवघे 36 हजार रुपये होते. या साधेपणाचा आदर्श घेऊन जिल्हा परिषद सदस्यांनी काम करावे.
जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी दौलत देसाई, मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, नवे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्ष शैलेश बलकवडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी,पंचायत समिती सभापती उपस्थित होते.