कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय): 25 जानेवारी रोजी 11 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर नव्याने नाव नोंदणी केलेल्या युवा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्यामार्फत PVC मतदार छायाचित्र ओळखपत्र दिले जाणार आहे. नव्याने नाव नोंदणी केलेल्या मतदारांना e-EPIC उपलब्ध करून दिले जाणार आहे. दि. 25 जानेवारी रोजी मतदान केंद्रावर उपस्थित राहून PVC मतदार छायाचित्र ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.
आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हास्तरीय कार्यक्रम virtually पध्दतीने साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माध्यमिक/उच्च माध्यमिक स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेमध्ये प्रथम तीन विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेत भाग घेतलेल्या दिव्यांग मतदारांना गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये आजअखेर एकूण 910 मतदारांनी सहभाग घेऊन प्रशस्तीपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेतलेले आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाची थिम ‘आम्ही आहोत.. सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक मतदार’ ही आहे.
निवडणूक आयोगाने दि. 25 जानेवारी रोजी 11 वा राष्ट्रीय मतदार दिवस कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून निर्गमित केलेल्या निर्धारित मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करण्यात येणार आहे.