कोल्हापूर ता.07 : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सुचनेनुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये गुरुवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2023 पासून जागरुक पालक सुदृढ बालक अभियान सुरु होत आहे. या सदंर्भात महापालिकास्तरीय कृती दल समितीची बैठक मंगळवारी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात पार पडली. या अभियानां अंतर्गत शहरातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील 127563 इतक्या बालकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करुन आवश्यकतेनुसार त्यांना पुढील उपचाराकरीता संदर्भित करण्यात येणार आहे.
प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी हि मोहिम नियोजनपूर्वक राबवून तपासणी करण्यात येणा-या बालकाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस उपायुक्त रविकांत आडसूळ, आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.गीता पिल्लई, तसेच प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या मोहिमेअंतर्गत बालकांची तपासणी शासकीय निमशासकीय शाळा, कनिष्ठ विद्यालय, खाजगी शाळा, अंध दिव्याग शाळा, अंगणवाडी, खाजगी बालवाडी, बालसुधारगृह व अनाथ आश्रम या ठिकाणी करण्यात येणार आहे. या अभियानांत गरजू आजार बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुरविणे तसेच सुरक्षित सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. या अभियानाचा शुभारंभ ताराबाई पार्क येथील न्यू मॉडल इंग्लिश स्कूल व मंगळवार पेठ येथील प्रायव्हेट हायस्कूल या ठिकाणी होणार आहे. या अभियानांतर्गत शाळेतील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात येणार असून पुढील 8 आठवडयामध्ये हि मोहिम शहरातील सर्व अंगणवाडी, शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळामध्ये राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या सावित्रीबाई फुले, पंचगंगा हॉस्पिटल व 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबीराच्या ठिकाणी सर्व वयोगटातील नागरीकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी शहरातील सर्व नागरीकांनी व तरुण मंडळांनी या आरोग्य व रक्तदान शिबीरामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत् करण्यात आले आहे.
याचबरोबर शासन निर्देशानुसार हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेची घोषणा होण्यासाठी दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.