२५८ दिवसांच्या हंगामात दीड कोटी लिटर इथेनॉल निर्मिती– अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती
बेलेवाडी काळम्मा, दि. १६:बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाच्या हंगामाची सांगता झाली. सन २०२३-२४ या हंगामात या प्रकल्पामध्ये एकूण एक कोटी, ५२ लाख, ३० हजार लिटर इथेनॉलची निर्मिती झाली. कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
या पत्रकात श्री. मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, नोव्हेंबर २०२२ मध्ये कारखान्याच्या विस्तारित डिस्टिलरी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रकल्प विस्तारीकरणाचे काम पूर्ण होऊन हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला. या हंगामात एकूण २५८ दिवस हा प्रकल्प चालला. पेट्रोलियम कंपन्यांना एकूण ९६ लाख, २८ हजार लिटरचा इथेनॉल पुरवठा झाला. तसेच; आजअखेर ४६ लाख, ४४ हजार लिटर रेक्टिफाइड स्पिरिट म्हणजेच आर. एस. चे उत्पादन झालेले आहे.
दरम्यान; कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाची सांगता जूनमध्ये झालेली आहे. सहवीज प्रकल्पाच्या हंगामाची सुरुवात एक नोव्हेंबर, २०२३ रोजी झाली होती. एकूण २१६ दिवस हा प्रकल्प चालला. या प्रकल्पामध्ये एकूण दहा कोटी, ७२ लाख, ३१ हजार, २४० युनिटची वीज निर्मिती झाली. त्यापैकी महावितरणला एकूण सात कोटी, ६४ लाख, ६२ हजार, पाचशे युनिट विज निर्यात करण्यात आली. उर्वरित; तीन कोटी, दहा लाख, ४६ हजार, ४३६ युनिटचा वापर कारखान्यात करण्यात आला.