बाल वारकऱ्यांसमवेत मोठ्या उत्साहात रमले दिंडीत
विठ्ठल -रखुमाईचे घेतले मनोभावे दर्शन
कागल, दि. १६: कागल शहरात चिमुकल्यांनी काढलेल्या वृक्ष व ग्रंथ दिंडीमध्ये पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफही मोठ्या उत्साहात सहभागी झाले. “विठोबा रखुमाई”, “झाडे लावा- झाडे जगवा”, “वाचाल तर वाचाल”, “ग्रंथ हेच गुरु…” अशा जयघोषात या बाल वारकऱ्यांसमवेत मंत्री श्री . मुश्रीफही चांगलेच रममान झाले.
कागलमधील मुख्य बाजारपेठेतून निघालेली ही वृक्ष व ग्रंथदिंडी शहराच्या उत्तरेला असलेल्या कोल्हापूर वेसजवळील श्री. विठ्ठल रुक्माई मंदिरात सांगता झाली. येथे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी विठ्ठल- रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले.
आषाढी एकादशीनिमित्त या वृक्ष व ग्रंथ दिंडीमध्ये कागल शहरातील श्रीमंत हिंदुराव घाटगे विद्यामंदिर, संत रोहिदास विद्यामंदिर, श्री. दत्त विद्यामंदिर, सर पिराजीराव घाटगे विद्यामंदिर, अजितसिंह घाटगे बाल विद्यामंदिर, गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिर, सावित्रीबाई फुले कन्या विद्यामंदिर या शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.