*निवडीबाबत आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत होणार खलबते*
कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका महापौर, उपमहापौर निवडीच्या तारखेची उत्सुकता संपली. पुणे विभागीय आयुक्तांनी कोल्हापूर महापौर व उपमहापौर निवड ६ फेब्रुवारी रोजी घेण्याचे आदेश ( शुक्रवारी दि. २३) काढले आहेत. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात ही निवड होणार आहे. महापौर व उपमहापौर या पदाच्या निवडणुकीचे कामकाज मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदी तसेच नियम २००५ व सुधारणा नियम २००६ व २०१० मधील सर्व तरतुदीनुसार पार पाडण्यात येणार आहेत.
दरम्यान महापौर, उपमहापौर निवडीसाठी उमेदवार निश्चित करणे, विषय समित्यांचे सभापती निवड यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या रविवारी महायुतींच्या नेत्यांची बैठक होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर, खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी यांच्या उपस्थित ही बैठक होणार आहे. या बैठकीत महापौर व उपमहापौर यांच्या नावावर खलबते होतील. त्यानंतर पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर महापालिकेत महायुतीने ४५ जागा मिळवून बहूमत प्राप्त केले आहे. महायुतीत भाजपला २६ जागा, शिवसेना शिंदे गटाला १५ जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४ जागा मिळाल्या आहेत. महायुतीतील जास्त जागाचा निकष विचारता घेता पहिला महापौर भाजपचा होणार हे निश्चित आहे. महापौर पदाचे आरक्षण हे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षीत झाले आहे. त्यामुळे भाजपकडे नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्यामध्ये विजयसिंह देसाई, प्रमोद देसाई, वैभव कुंभार यांच्या समावेश आहे. महापौर पदासाठी विजयसिंह देसाई, प्रमोद देसाई, वैभव कुंभार यासह विजयसिहं खाडे-पाटील, रुपाराणी निकम यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या संयुक्त बैठकीत या सहा नावावर चर्चा होणार आहे. महापौर निवड कोणाची करावा, याबाबत महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची मतेही जाणून घेण्यात येणार आहेत. जर भाजपाचा महापौर निवडावयाचा झाल्यास भाजपच्या तीन नगरसेवकांची नावे निवडली जातील. ही तीन नावे भाजपच्या प्रदेश समितीकडे पाठवली जातील, तिकडून महापौरांचे नाव निश्चित होईल, असे चित्र आहे.
दरम्यान शिवसेना शिंदे गटानेही महापौर पदावर दावा सांगितला आहे. तशी अपेक्षा आ. राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे. महापौर पदासाठी शिवसेनेकडून ओबीसी प्रवर्गाचा दाखला असलेले अजय इंगवले, आश्किन आजरेकर, अभिजित खतकर यांची नावे चर्चेत आहेत. पण जास्त जागांचा निकष विचारात घेता यावेळी प्रथम महापौर हा भाजपचा होईल, असे चित्र आहे. दरम्यान उद्या होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत महापौर व उपमहापौर यांच्या नावावर चर्चा होणार आहे. तसेच विषय समित्यांमध्ये स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण समिती, महिला व बाल कल्याण समिती, गट नेता, सभागृह नेता या पदाच्याही निवडी होणार आहेत.
महापौर व उपमहापौर पदाची खांडळी होणार का
जिल्ह्यातील इचलकरंजी महापालिकेत पाच वर्षात ६ नगरसेवकांना महापौर होण्याची संधी देण्याची शक्यता आहे, त्यामुळे इचलकरंजी ८ ते ९ महिन्याचा महापौर होईल, असे चित्र आहे. त्यामुळे इचलकरंजी जर महापौर पदाची खांडोळी केली जाणार असेल तर कोल्हापूर महापालिकेत का नाही, असा प्रश्न आता नेते, कार्यकर्ते यांच्यातून विचारला जाऊ लागला आहे. यामुळे कोल्हापूरचा महापौर व सव्वा वर्षाचा होईल, अशी चर्चा आहे. महापौर पदासाठी जर सव्वा वर्षाचा कालावधी ठरला तर कोल्हापूरात पाच वर्षात चौघांना महापौर व उपमहापौर होण्याची संधी मिळू शकते. तसेच इचलकरंजी प्रमाणे जर सहा महापौर करण्याचा निर्णय झाला तर आठ ते नऊ महिन्याचा महापौर होऊ शकतो. पण हा सर्व निर्णय उद्या रविवारी होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत बरीच चर्चा होऊ शकतो. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीकडे शहरावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोल्हापूर महापौर, उपमहापौर निवड ६ फेब्रुवारीला
RELATED ARTICLES







