कोल्हापूर/प्रतिनिधी
‘आयपास’ या प्रणालीमुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाबाबत नागरिकांना माहिती मिळणार आहे. त्यामुळे पारदर्शीपणा राहणार आहे. हे तत्व लक्षात घेतल्यास निधीचे व्यवस्थित नियोजन होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
जिल्हा नियोजन कार्यालयामार्फत येथील शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात ‘आयपास’ इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ॲटोमेशन सिस्टिम बाबत आज प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करून आयपास या प्रणालीविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हा नियोजन समितीचा निधी जिल्ह्यातील विविध विभागांमार्फत व्यवस्थित खर्च होतोय की नाही यासाठी प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी ही प्रणाली राज्यामध्ये आणली. राज्यामध्ये विविध 140 योजना आहेत. त्यापैकी 97 आपल्या जिल्ह्यांमध्ये लागू आहेत. या प्रणालीमुळे कामामध्ये गती येईल.
महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यावेळी म्हणाले, या ऑनलाईन प्रणालीमुळे जिल्ह्याच्या कामाला गती मिळणार आहे. खातेप्रमुखांनी ही प्रणाली समजून घ्यावी. प्रथम पासूनच या प्रणालीमध्ये सर्वांनी काम करावे, जेणेकरून युजर फ्रेंडली होवून जाईल.
जिल्हाधिकारी श्री. देसाई पुढे म्हणाले, या प्रणालीमध्ये भविष्यात सुधारणा होत जातील, पण पायाभूत संकल्पना सर्वांनी समजून घ्यावी. या प्रणालीमुळे कागदांचे काम कमी होवून गतिमानता येणार आहे. निधी परत करणं किंवा परत जाणं या सारख्या गोष्टि सध्या घडत असतात. या प्रणालीमध्ये माहिती भरल्यानंतर ती नागरिकांनाही समजणार आहे. त्यामुळे निधीचे व्यवस्थित नियोजन होण्यास निश्चित मदत होईल.
सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद मस्के यांनी स्वागत आणि सूत्रसंचालन केले. मिलिंद चौधरी यांनी या प्रणालीविषयी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते