कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूरात गेल्या काही महिन्यांपासून खराब रस्त्यामुळं धुळीचे साम्राज्य निर्माण झालयं. त्यामुळे हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून वाहनधारकांसह नागरिकांना आरोग्याचा त्रास होत आहे. तरी यावर उपाययोजनेसह तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी प्रमुख मागणी कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीनं करण्यात आलीयं. सदर मागणीचे शिष्टमंडळातर्फे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांना देण्यात आलं.
निवेदनात म्हटलं आहे की कोल्हापूर शहरातील रस्ते खराब झाले आहेत.रस्त्यांवरचे डांबर उखडून गेले असल्यामुळे माती आणि मुरूम रस्त्यावर आले आहे. यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ही परिस्थिती निर्माण होण्यामागे प्रामुख्याने रस्त्याची झालेली दुर्दशा, रस्ता डागडुजी करण्यासाठी वापरण्यात आलेला मुरूम व माती या गोष्टी कारणीभूत आहे.त्यामुळे या धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत. तरी याची योग्य ती दखल घेऊन उपाययोजना व कार्यवाही करण्यात यावी तसेच याप्रश्नी महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिष्टमंडळाने यावेळी केली.
यावेळी वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड, दिलीप सूर्यवंशी, अशोक जाधव, पुष्पक पाटील ,पोपट रेडेकर यांच्या सह वाहनाधरक उपस्थित होते