राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
नागपूर /प्रतिनिधी दुष्काळ, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींनी पिचलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे ३०सप्टेंबर २०१९पर्यंतचे बिना अटी सरसकट कर्ज माफ केले आहे. तसेच यावेळी राज्य सरकारने नियमित कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील लवकरच मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.‘राज्यातील शेतकऱ्यांना २०१९पर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अटी शर्ती घालण्यात आलेल्या नाही. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही जाऊन हेलपाटे घालावे लागणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.