कोल्हापूर /प्रतिनिधी
गडकोट हे आपली अस्मिता असून ती आपल्याला नेहमी शौर्यगाथांची आठवण करून देतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या विशाळगडावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. ही अतिक्रमण आहेत. हे स्पष्ट असतांना ती काढून टाकण्यासाठी पुरातत्व विभाग कोणतीही कृती करण्यास तयार नाही. ही अतिक्रमण काढण्याविषयी विचारणा केल्यावर मनुष्यबळाचा अभाव, तसेच अन्य वेळकाढू कारणे दिली जातात. विशाळगड येथील अतिक्रमणांना प्रशासनाची विशेष सवलत का ? असा परखड प्रश्न ‘लष्कर-ए-हिंद’ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी उपस्थित केला.
आपल्या मार्गदर्शनात ईश्वरप्रसाद खंडेलवाल पुढे म्हणाले, ‘‘कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या परिसरात असलेल्या मनकर्णिका कुंडावरील अतिक्रमण आंदोलन करून, मागणी करूनही काढले जात नाही, हे दुर्दैवी आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरणास काही लोक अकारण विरोध करत आहेत.’’
दिवशी पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर (पेटाळा) आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेत बोलत होते. या सभेत हिंदु जनजागृती समितीचे गुजरात, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता समीर पटवर्धन, तसेच सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह आजूबाजूच्या गावातील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. पुरोहितांनी केलेल्या वेदमंत्रपठणाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी मांडला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समितीचे श्री. विपुल भोपळे यांनी केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ‘सनातनचे दुसरे बालक-संत : पू. (चि.) वामन राजंदेकर’ या ग्रंथमालिकेतील पहिला खंड’ याचे प्रकाशन करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनात अधिवक्ता समीर पटवर्धन म्हणाले, ‘‘नागरीकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात हिंसक आंदोलने चालू आहे. अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळ, सार्वजनिक संपत्तीची हानी असे प्रकार होत आहेत. या सर्व समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे. देशाच्या संपत्तीची हानी करणार्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. ही हानी करणार्यांकडून ती वसूल करण्यासाठी येणार्या काळात हिंदू विधीज्ञ परिषद लढा देईल.’’
विद्येचे माहेरघर असणारी विद्यापिठे आज देशविरोधी कारवायांची केंद्र बनत आहेत ! – श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
या वेळी श्री. मनोज खाडये म्हणाले, ‘‘देशातील प्रथितयश विद्यापिठांमध्ये आज शिक्षण सोडून विद्यार्थ्यांना हिंसक कारवायांसाठी उद्युक्त केले जात आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या कालावधीत पोलिसांवर दगडफेक केली. त्याही पुढे जाऊन बसगाड्या आणि पोलिसांची वाहने जाळली. यात पोलीस, अग्नीशमन दलाचे कर्मचारी आणि १०० जण जखमी झाले. लखनौ येथील नदवा महाविद्यालयामध्ये नागरी सुधारण कायद्याला विरोध करतांना समाजकंटक विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगड, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि चपला फेकल्या. ‘अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालया’त तर भारतीय सैन्यदलाने काश्मीरमध्ये ठार मारलेल्या मन्नान वाणी या आतंकवाद्याला ‘शहीद’ म्हणत त्याच्यासाठी प्रार्थना केली गेली. त्यामुळे जामिया मिलिया इस्लामिया विश्वविद्यालयातील आवारात एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यासाठी लागणारे दगड आणि जाळपोळ करण्यासाठी लागणारे इंधन कुठून आले ?, या षड्यंत्रामागे कोण आहे ?, याची सखोल चौकशी करून दोषी आढळणार्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी आपण प्रत्येकानेच केली पाहिजे.
काशी हिंदु विश्वविद्यालयात असलेल्या स्वा. सावरकरांच्या प्रतिमा तोडून त्यांचा अवमान करण्यात आला. या एकमेव ‘हिंदु विश्वविद्यालया’च्या उच्च शिक्षणातील ‘रामायण’, ‘महाभारत’ यांचा अभ्यासक्रम वगळण्यात आला. या सर्व घटना देशातील शिक्षणसंस्थांतून आपल्या हिंदु भावी युवापिढीला काय बाळकडू मिळत आहे ? अशा विद्यापिठांतून राष्ट्रभक्त निर्माण होतील कि देशद्रोही ? त्यामुळे दुर्दैवाने विद्येचे माहेरघर असणारी विद्यापिठे आज देशविरोधी कारवायांची केंद्र बनत आहेत, असेच म्हणावे लागले. त्यामुळे प्रत्येक विद्यापिठांमध्ये आदर्श अशा राष्ट्र निर्माणासाठी अन् संत ज्ञानेश्वर-तुकाराम महाराज यांच्यासारखे संत; छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांसारखे हिंदुराजे; लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग आदींसारखे राष्ट्रपुरुष घडवण्यासाठी हिंदु राष्ट्राचीच नितांत आवश्यकता आहे.’’