कोल्हापूर ता.18 : शहरातील पंचगंगा नदी घाट परीसर, रंकाळा तलाव, राजाराम बंधारा, कोटीतीर्थ तलाव या जलसाठयांच्या ठिकाणी कचरा व निर्माल्य टाकूण प्रदूषण करणाऱ्यांवर महापालिकेच्यावतीने कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे या जलसाठयाच्या ठिकाणी जनावरे व वाहने धुणे अशा प्रकारचे कृत्य करून पाण्याचे प्रदुषण व अस्वच्छता करणाऱ्यां नागरीकांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने चार स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये आरोग्य निरीक्षक, विभागीय आरोग्य निरीक्षक, मुकादम व महापालिकेचे कर्मचारी यांचा समावेश आहे. याचबरोबर संबंधीत पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे
तरी शहरातील पंचगंगा नदी घाट परीसर, रंकाळा तलाव, कोटीतीर्थ तलाव व राजाराम बंधारा या ठिकाणी कचरा, निर्माल्य टाकणे, जनावरे व वाहने धुणे असे कृत्य करणाऱ्या नागरीकांवर महापालिका व पोलिस प्रशासनाच्यावतीने दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील नागरीकांनी निर्माल्य अथवा कचरा टाकून तसेच जनावरे व वाहने धुवून प्रदुषण अथवा अस्वच्छता करू नये असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.