ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पुतळ्याचे पूजन व दुग्धाभिषेक
कागल/प्रतिनिधी :
कागलमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला. येथील बसस्थानकाजवळच्या अश्वारूढ पुतळा परिसरात शहरातील प्रमुख मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळी अकरा वाजता शहराच्या मुख्य बाजारपेठेतून सवाद्य मिरवणूक निघाली. मिरवणुकीपुढे हातात शिवज्योत घेतलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, नगराध्यक्षा सौ. माणिक माळी, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर आदी प्रमुख उपस्थित होते. गैबी चौकातून निघालेली ही मिरवणूक पुढे पोलीस स्थानक, खर्डेकर चौक, कोल्हापूर वेश कमानीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यापर्यंत आली. मिरवणुकीवर ठीकठिकाणी गॅलरी आणि स्वागत कमानीवरून फुलांचा वर्षाव होत होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांच्या निनादात ही मिरवणूक निघाली.