कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाने मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील १५० हून अधिक स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव नुकताच अनोख्या पद्धतीने करण्यात आला. दुबईस्थित ‘अल अदिल’ समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी या करोना योद्ध्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी त्यांना हापूस आंब्याच्या पेट्यांची भेट पाठवली. तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापक धनश्री पाटील यांच्या माध्यमातून या सर्व करोना योद्ध्यांचा सत्कारही केला.
पुणे शहर, परिसर व आसपासच्या तालुक्यांत करोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे हिंदू व मुस्लिम स्वयंसेवक प्रामुख्याने मूळनिवासी मुस्लिम मंच (येरवडा), कैलास स्मशानभूमी कामगार गट, उम्मत संस्था व वैकुंठ स्मशानभूमीतील स्वरुपवर्धिनीचा गट यांच्या माध्यमातून अविरत सेवा देत आहेत. करोना साथीच्या काळात आरोग्यसेवा आणि आपत्कालीन सेवा देणाऱ्या अन्य घटकांचे कौतुक झाले, परंतु अनेक अडचणी सहन करत अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या अंत्यसंस्कार स्वयंसेवकांच्या वाट्याला साधी प्रशंसाही आली नव्हती. या लोकांचा उचित गौरव व्हावा या हेतूने धनश्री पाटील यांनी दुबईस्थित डॉ. दातार यांच्याशी संपर्क साधला. समाजसेवेची आवड असणाऱ्या डॉ. दातार यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. सध्याच्या स्थितीत पुण्यात प्रत्यक्ष येणे शक्य नसल्याने डॉ. दातार यांनी या स्वयंसेवकांसाठी कोकणातून हापूस आंब्याच्या पेट्या मागवून घेतल्या व त्यांचे वितरण हे स्वयंसेवक काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन करण्यात आले. याकामी मूळनिवासी मुस्लिम मंचाचे सबीर शेख, कैलास स्मशानभूमी कामगार गटाचे ललित जाधव, उम्मत संस्थेचे जावेद खान व स्वरुपवर्धिनी संघाचे अविनाश धायरकर यांचे सहकार्य लाभले.
या अनोख्या उपक्रमाविषयी बोलताना धनश्री पाटील म्हणाल्या, की “कोरोनाबाधित मृतदेहांवर एकही रुपया न घेता अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वयंसेवकांचे काम व योगदान समाजापुढे येणे मला गरजेचे वाटले. या योद्ध्यांनाही त्यांचा प्रथमच कुणीतरी सत्कार करत असल्याचे पाहून खूप आनंद झाला. हे स्वयंसेवक जात-धर्म न बघता सर्व मृतदेहांवर त्यांच्या त्यांच्या धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्काराचे काम बांधीलकीने व आत्मीयतेने करतात. रुग्णालयांतील बेवारस मृतदेहांवरही ते अंत्यसंस्कार करतात. डॉ. दातार यांनी पाठवलेल्या भेटीने तसेच सत्काराने त्यांनाही आपलेसे वाटले. आमच्यासाठी त्यांनी कामातून वेळ काढून इफ्तार मेजवानीचेही आयोजन केले, हे आमच्यासाठी भारावून टाकणारे होते.”
करोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करताना येणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकताना कैलास स्मशानभूमी कामगार गटाचे ललित जाधव म्हणाले, की गेले वर्षभर आम्ही रात्रंदिवस या कामात व्यग्र आहोत, परंतु सध्याची साथीची लाट तीव्र असल्याने स्मशानभूमीत येणाऱ्या कोरोनाबाधित मृतदेहांची संख्या रोज वाढत आहे. ओघानेच आमच्यावरही कामाचा खूप ताण येत आहे. सतत पीपीई किट घालून सज्ज राहणे, मृतदेहांवर विनाविलंब अंत्यसंस्कार करणे व त्याचवेळी स्वतःलाही सुरक्षित राखणे हे आव्हान आहे. आमच्या कामातील अडचणी समजून घेऊन सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे, एवढीच आमची अपेक्षा आहे.
उम्मत संस्थेचे ५० स्वयंसेवक पुण्याच्या आसपासच्या तालुक्यांतही जाऊन अंत्यसंस्काराचे काम करतात. मुस्लिम स्वयंसेवकांचा सध्या रमजानकाळात कडक उपवास असतो मात्र तहानभुकेची पर्वा न करता ते कर्तव्यनिष्ठेने कामात व्यग्र राहतात. रमजानच्या पवित्र महिन्यात माणुसकी व मदतीला फार महत्त्व असते, असे नमूद करुन उम्मतचे जावेद शेख यांनी डॉ. दातार यांच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. धनंजय दातार म्हणाले, की करोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वयंसेवकांच्या धैर्याला आणि सेवासमर्पिततेला तोड नाही. करोना शब्द उच्चारताच लोक घाबरतात आणि लांब राहतात, परंतु हे स्वयंसेवक मात्र जीव धोक्यात घालून रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. हे थोर काम आहे. मी या उपक्रमात फार काही मोठे केलेले नाही. पुण्यातील करोना योद्ध्यांच्या जीवनात थोडा गोडवा आणला इतकेच. असेच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यास मी व माझा उद्योग समूह कटिबद्ध राहू.