‘सन मराठी’ प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ कार्यक्रमात ‘गुलाबी साडी’ या गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावणारा असा गायक संजू राठोड पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स करण्यासाठी येत्या ८ डिसेंबर २०२४ रोजी प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे सायंकाळी ५ वाजता येणार आहे. ‘सन मराठी’ वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अव्वल ठरली आहे. ‘सन मराठी’ प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ हा कार्यक्रम यंदा कोल्हापूर मध्ये राबवण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ज्याने ‘गुलाबी साडी’ या गाण्याचं वेड लावलं तो म्हणजे गायक संजू राठोडच्या गाण्यांची मैफिल, त्याचबरोबर कॉमेडी रिलस्टार निक शिंदेचा भन्नाट परफॉर्मन्स पाहायला मिळेल. एवढंच नाही तर अभिनेत्री माधुरी पवारची दिलखेचक अदा, माधवी निमकरची ठसकेबाज लावणी, नृत्यांगणा नेहा पाटीलचा बहारदार डान्स असणार आहे. या तिघींचा डान्स परफॉर्मन्स पाहणं म्हणजे मनोरंजनाचा धमाल बार उडणार. या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या आवडत्या ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेतील सुपरहिट जोडी म्हणजे सत्या- मंजुचा रोमँटिक डान्स सुद्धा असणार आहे.
‘मेळा मनोरंजनाचा’ या कार्यक्रमात संगीत, नृत्य असा मनोरंजनाचा नजराणा असणारच आहे पण याचबरोबर’सन मराठी’च्या कलाकारांना भेटण्याची संधी तसेच त्यांच्या बरोबर धमाल गप्पा, सेल्फी काढण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांसह फोटो काढण्यासाठी खास सेल्फी झोनही तयार करण्यात आला आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन इथेच थांबणार नाही तर सुप्रसिद्ध गायक केवल वाळुंज, गायिका सोनाली सोनावणे या कलाकारांच्या बहारदार गाण्याने या कार्यक्रमात आणखी रंगत येणार आहे.
वारसा जपणाऱ्या या आपल्या कोल्हापूर शहरात ‘सन मराठी’ प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ हा कार्यक्रम येत्या ८ डिसेंबर २०२४ रोजी कोल्हापूर येथील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी शुल्क आकारण्यात आलेले नसून प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य असेल. तुम्ही या बातमीचा फोटो काढूनही पास म्हणून वापरू शकता.चला तर मग मंडळी आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि ८ डिसेंबरची संध्याकाळ खास बनवा.