कोल्हापूर, ता. 18 – नियमांच्या अधीन राहून सराफ व्यावसायिकांनी आपापली दुकाने उद्यापासून सुरू करावीत, असे आवाहन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी केले.
या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, पाच दिवसांचा अपवाद वगळता गेल्या 100 दिवसांपासून सराफी दुकाने बंद आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांवर तर परिणाम झालाच शिवाय ग्राहकांनीही या समस्येचा सामना करावा लागला. मात्र पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्यानंतर शनिवारी प्रशासनाने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
कोरोनाला सोबत घेऊन जायचे असले तरीही येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा विचार करता सर्वच सराफ व्यावसायिकांनी प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन तर करावेच शिवाय दुकानात ग्राहकांची गर्दी होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. ग्राहकांनीही आपल्या पारंपरिक सराफ व्यावसायिकडे यावयाचे असेल त्याअगोदर संपर्क केल्यास व्यावसायिक व ग्राहक अशा दोघांच्या सोयीचे होईल. त्याशिवाय दुपारी चारनंतर कोणतेही दुकान सुरू राहणार याचीही दक्षता घ्यावी.
दरम्यान, दुकाने सुरू, दुकाने बंद या कालावधीत सर्वच माध्यमांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार या माध्यामातून मानत असल्याचेही श्री. गायकवाड यांनी सांगितले.