कोल्हापूर, दि. 7 (जिमाका): श्रीज्योतिबा यात्रेला अवघे काही दिवस उरले आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात चैत्र यात्रा होत आहे. यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होता कामा नये, तसेच सेवा-सुविधांमध्ये हयगय करु नका, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.
येत्या 16 एप्रिल रोजी वाडी रत्नागिरी येथे श्रीज्योतिबा चैत्र यात्रा साजरी होत आहे. या यात्रेनिमित्त किमान ६ ते ७ लाखापर्यंत भाविक देवदर्शनास येतात. या यात्रेचे नियोजन व पूर्व तयारीबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली वाडी रत्नागिरी येथील एमटीडीसी रिसॉर्ट येथे गुरुवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पन्हाळाचे उपविभागीय अधिकारी अमित माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र साळोखे, तहसीलदार रमेश शेंडगे, कोडोली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, सरपंच राधा बुणे यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणामुळे यावर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यात्रेच्या दृष्टीने सर्व विभागांनी चांगली तयारी केली आहे, मात्र यात कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. याठिकाणी येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, बस वाहतूक, पार्किंग, आरोग्य आदी सर्व सोयी- सुविधा पुरवाव्यात. कोणत्याही परिस्थितीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडेझुडपे काढून घ्या. रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ काढून घ्या. डोंगरावरील अंतर्गत रस्ते, वाहनतळ मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करावी. मंदिराच्या बाहेरील दर्शन रांग मार्गाची दुरुस्ती करुन घ्यावी. पायी चालत जाण्याच्या मार्गावर दगड, खडी येवू नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्ता दुरुस्ती करुन घ्यावी. भाविकांना पिण्याचे पाणी अपुरे पडू नये, यासाठी जादा क्षमतेचे पाण्याचे टँकर पुरवा. फिरत्या स्वच्छतागृहांची संख्या वाढवा. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करुन घ्या. पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी पंप सुस्थितीत असल्याची खात्री करा, भाविकांना सेवा सुविधा पुरवताना कोणत्याही परिस्थितीत कमतरता राहू नये, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिले.
दुचाकी, चारचाकी वाहनतळ, दर्शन मार्ग, बाहेर पडण्याचा मार्ग आदी माहिती भाविकांना सहजगत्या मिळण्यासाठी त्या त्या ठिकाणी माहिती फलक लावा. पोलीस व आरोग्य विभागासाठी तंबू उभा करावेत, याठिकाणी रुग्णवाहिका तैनात ठेवावी. आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास सहजपणे बाहेर पडता येण्यासाठी रस्त्यावर गाड्या लावण्यात येणार नाहीत, याची दक्षता घेवून वाहनतळाची व्यवस्था करावी. आग सुरक्षेच्या दृष्टीने व्यावसायिक व स्थानिकांनी आग प्रतिबंधक नळकांडी ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. भेसळयुक्त अन्न पदार्थ व भेसळयुक्त गुलालाची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.
यात्रेनंतर डोंगर परिसरात कचरा राहू नये तसेच दुर्गंधी होवू नये यासाठी स्वच्छता, कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली श्रीज्योतिबा मंदिर परिसराची पाहणी- जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी श्रीज्योतिबा मंदिर परिसराची पाहणी करुन संबंधित विभागांना सूचना केल्या. मंदिर परिसरात व दर्शन रांगेत ढकलाढकली होणार नाही याची दक्षता घ्यावी. यात्रेच्या मुख्य दिवशी तसेच मानाच्या सासनकाठ्यांचे पूजन प्रसंगी होणारी गर्दी लक्षात घेवून ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवा. आपत्कालीन परिस्थितीत संदेशाची देवाणघेवाण करता येण्यासाठी पब्लिक अड्रेस सिस्टीम सह पर्यायी संदेश व्यवस्था तयार ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी केल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीस विभागाच्या तयारीबाबत माहिती देवून यात्रा काळात गर्दीमुळे अनुचित प्रकार घडू नये व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या तयारीबाबत तर सचिव शिवराज नाईकवाडे यांनी देवस्थान समितीने केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली.