*नामदार हसनसो मुश्रीफ हे संपूर्ण जिल्ह्याचे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा वाढदिवस यावर्षी १० एप्रिल रोजी रामनवमी या दिवशी संपन्न झाला.
कोल्हापूरः ता. १५:कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व अश्या अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या एका निधर्मी वागणुकीच्या मा. मुश्रीफ साहेबांच्या बाबतीत आम्हाला भावलेल्या या वैशिष्टयांचा उल्लेख आम्ही त्यांना देत असलेल्या शुभेच्छा जाहिरातीत केला. शिवाय; आपण परमेश्वररुपी श्रीरामाना कुठेही शोधू शकतो. सृष्टीतील चराचरात, देहात, आत्म्यात. व्यक्तीच्या सद्गुणांना आपण रामविचारी असंही म्हणतो.*
*प्रभू श्रीरामचंद्र हे विश्वरुपी दैवत आहे, प्रत्येकाचेच. हिंदूंव्यतिरिक्त इतरही धर्मातील लोक श्रीरामप्रभुंची भक्ती करतात, त्यांना विचारांचा आदर्शही मानतात. मा. मुश्रीफसाहेब आपल्या मस्तकी भगवा अष्टगंध लावून श्रीरामप्रभूपुढे नतमस्तक होतात, तर ललाटी अबीर लावून विठुरायांची पालखीही खांद्यावरून अनवाणी चालत वाहतात. हे समस्त जनतेने बघितले आहे. या निधर्मीपणाचे अनेकांना कौतुकच वाटले आहे. एक राजकारणी म्हणून नव्हे; तर राजर्षी शाहू महाराजांच्या निधर्मी करवीर नगरीचं एक निधर्मी नेतृत्व म्हणूनच समस्त जनता त्यांच्याकडे पहाते.
कोल्हापूर ही स्पृश्य, अस्पृश्य, धर्मकांड अश्या समाजद्रोही वृत्तीला थारा न देणारं मोठ्या विशाल मनाची आणि उदार अंतकरणाची भूमी आहे. इथे संकुचित मनोवृत्तीला थारा नाही. त्यातून जाहिरात ही एक कला आहे. या कलेतून साकार झालेल्या या जाहिरातीचे अनेकांनी मुक्त मनाने कौतुकही केले आहे. श्रीरामप्रभू विषयी आम्हांला नितांत आदर आणि मनात भक्तीही आहे. आम्ही सर्व संचालक गोकुळच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर प्रथम प्रभू श्रीकृष्णांचे दर्शन घेतो आणि नंतरच आमच्याकामी आम्ही रुजू होतो. भगवान श्रीकृष्ण आणि श्रीरामप्रभू यांच्यातील धागाही आपणांस माहीत आहे. ही आमच्या प्रत्येकाच्या मनातील परमेश्वराप्रती भक्तीची भावना नाही का ? प्रसिध्द झालेल्या त्या जाहिरातीमधून भगवान श्रीरामप्रभूंची मुश्रीफसाहेबांशी तुलना करण्याचा आमचा कोणताही उद्देश नव्हता किंवा हे निवेदन सादर करतानाही नाही.*
यास्तव, आम्ही या जाहिरातीतून कोणाच्याही धार्मिक किंवा श्रीरामप्रभूशी वैयक्तीक बरोबरी करून भावना दुखावण्याचा यत्किंचितही प्रयत्न केलेला नाही. हे कृपया समजून घ्यावे.
दरम्यान, ही जाहिरात ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी आम्ही शुद्ध, चांगल्या भावनेने दिलेली होती. परंतु; या जाहिरातीबद्दल काही मंडळींनी विनाकारण घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून नामदार मुश्रीफसाहेबांना जो मनस्ताप झाला, जो त्रास झाला त्याबद्दल व या जाहिराती मुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
*आपले नम्र
*चेअरमन -श्री. विश्वास नारायण पाटील- आबाजी
*संचालक – अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, अभिजीत तायशेटे, नविद मुश्रीफ, अजित नरके, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, श्रीमती अंजना रेडेकर●कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर●