दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी औद्योगिक क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी Sophisticated Analytical Instrument Facilities (SAIF) सेंटर आणि University-Industry Interaction Centre (UIIC), शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर तर्फे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठातील केंद्र सरकार च्या ‘विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या’ निधीद्वारे कार्यरत असणार्या सैफ सेंटर मधील उच्च वैज्ञानिक आणि तांत्रिक पायाभूत सुविधा औद्योगिक क्षेत्रापर्यंत पोहोचाव्या हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न समजून घेऊन त्यावर एकत्रित येऊन कशापद्धतीने उपाय योजना करता येतील यावर सुद्धा चर्चा या कार्यशाळेत झाली.
या कार्यशाळेत कोल्हापूर आणि परिसरातील अनेक औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठातील सैफ सेंटरचे प्रभारी प्रमुख प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी या कार्यशाळेबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर द इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन (IIF), कोल्हापूर चेम्बर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज (KCCI), शिरोली मॅन्युफॅक्चररर्स असोसीएशन (SMAK), भारतीय उद्योग परिसंघ(CII), जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर, महाराष्ट्र शासन (DIC), गोशिमा, मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल आणि हातकणंगले, अशा विविध संस्थांच्या अध्यक्षांनी कार्यशाळेबद्दल मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर विद्यापीठातील उच्च वैज्ञानिक आणि तांत्रिक पायाभूत सुविधांचा उपयोग औद्योगिक क्षेत्राला कसा होऊ शकेल या विषयी विद्यापीठ आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांच्या चर्चासत्र संपन्न झाले. यामध्ये अनेक शिक्षक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी संपूर्ण चर्चासत्राचा गोषवारा केला. पुस्तकी अभ्यासक्रम आणि औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष केले जाणारे काम यामध्ये असणारी तफावत कमी करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे असा त्यांनी उल्लेख केला. मोठ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे जिकिरीचे असते, त्यात खूप जास्त वेळ जाऊ शकतो. लहान उद्योगांचे छोटे प्रश्न प्रथम घेऊन सतत संपर्कात राहणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी चक्रीय अर्थव्यवस्था, कचरा व्यवस्थापन, एकत्रित कार्यशाळा आयोजन अशा विषयांचा उल्लेख केला. आणि ही कार्यशाळा आयोजित केल्या बद्दल त्यांनी प्रा सोनकवडे, प्रा डेळेकर आणि समितीचे आभार मानले.
त्यानंतर उच्च वैज्ञानिक आणि तांत्रिक पायाभूत सुविधा उपलब्ध असणार्या सैफ सेंटर ला भेट देऊन मान्यवरांनी या सुविधा सखोलपणे समजून घेतल्या. सैफ सी एफ सी विभागातील सहाय्यक तंत्रज्ञांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
येत्या ६ मे रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार येणाार आहे. या ‘कृतज्ञता पर्व’ दरम्यान हा उपक्रम आयोजित केला आहे.
विद्यापीठातील शैक्षणिक, विश्लेषण सुविधा आणि औद्योगिक क्षेत्रातील गरज यामधील अंतर कमी करण्यासाठी हि कार्यशाळा नक्कीच उपयोगी होईल.
अश्विनी पाटील यांनी सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.