कोल्हापूर ता.17 : पुईखडील जलशुध्दीकरण केंद्रातील एका सेटलींग टाकीचा गाठ काढण्याचे काम एका दिवसात पुर्ण करण्यात आले आहे. पुईखडील जलशुध्दीकरण केंद्रातील सेटलींग टाकी व संप आणि पंप हाऊस येथील गाळ काढणेची मोहिम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे या जलशुध्दीकरण केंद्रातील गाळ काढण्यात आला नव्हाता. यावर्षी पावसाळयापुर्वी हा गाळ काढण्यात येत आहे. बुधवारी दुस-या सेटलींग टाकीचा गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येणार असून गुरूवार संप आणि पंप हाऊसमधील गाळ काढण्यात येणार आहे. पहिल्या सेटलींग टाकीमध्ये साधारणत: दोन ते तीन फुट गाळ साचला होता. हा गाळ 15 कर्मचा-यांच्या व दोन फायर फायटर , पाच वॉटर टँकरच्या सहाय्याने काढण्यात आला. हा गाळ जल अभियंता हर्षजीत घाटगे व शाखा अभियंता प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. पुईखडील जलशुध्दीकरण केंद्रातील गाळ काढण्याचे काम सुरु असल्याने ए, बी वॉर्ड व सलग्नीत उपनगरे ग्रामीन भागास दिनांक 19 मे 2022 अखेर कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.