कोल्हापूर ता.20 – दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 5 टक्के निधीतून शहरातील दिव्यांगांच्या बँक खातेमध्ये अनुदान जमा बुधवारी जमा करण्यात आले आहे. सन 2022-23 चा आर्थिक वर्षामध्ये शासन निर्णयानुसार महानगरपालिकेमार्फत दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात येणा-या 5 टक्के निधीचा प्रशासक दप्तरी ठराव करण्यात आला आहे. यामधील दिव्यांगांना रोख स्वरूपात आर्थिक सहाय्य देण्याची योजना आहे. दिवाळीपूर्वी नोंदणीकृत दिव्यांगांना हा लाभ देण्यात आला. दिव्यांगांच्या 21 प्रकारांमध्ये ज्या दिव्यांगांचे दिव्यांगत्व 70 टक्के पेक्षा जास्त आहे अशा 855 दिव्यांगांना दरमहा रू.1500/- प्रमाणे सहा महिन्यांचे प्रत्येकी रू.9000/- जमा झाले आहेत. 70 टक्के पेक्षा कमी दिव्यांगत्व असणा-या 1345 दिव्यांगांना दरमहा रू.1000/- प्रमाणे सहा महिन्यांचे प्रत्येकी रू.6000/- जमा झाले आहेत. तर 68 कुष्ठरोगी बांधवांना दरमहा रू.1500/- प्रमाणे सहा महिन्यांचे प्रत्येकी रू.9000/- प्रमाणे अनुदान जमा करण्यात आले आहे. हे अनुदान त्यांच्या बँक खातेवर बुधवार दि.19 ऑक्टोंबर 2022 रोजी जमा करण्यात आले आहे. तसेच ज्या दिव्यांगांच्या खात्यावर काही तांत्रिक अडचणीमुळे निधी जमा झाला नाही अशा दिव्यांग बांधवानी महापालिकेच्या दिव्यांग कक्षास संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.