उदगीर प्रतिनिधी, — भारताला समजून घ्यायचे असेल तर स्वामी विवेकानंद समजून घ्यावे लागेल कारण ज्ञानप्रसाराची आणि प्रबोधनाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडत धर्माची वास्तव मांडणी केलेली असून हजारो वर्षांपासूनचे भारतीय अध्यात्म व विज्ञान जगाला समजावून सांगणारे विवेकानंद जीवन चरित्र होय, असे विचार धुमाळे तुकाराम यांनी व्यक्त केले.
आदर्श शिक्षक बालाजी सुवर्णकार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या २७७ व्या वाचक संवाद मध्ये धुमाळे तुकाराम व्यंकटराव पं. समिती उदगीर (दिव्यांग तालुका समन्वयक) यांनी स्वामी निखिलानंद लिखित विवेकानंद जीवन चरित्र या साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाले की धर्माचे वैभव आणि शक्ती स्वामीजींच्या बलसंवर्धक, कार्य प्रेरक विचारांचा प्रवाह , व्यापक अंतकरण, विशाल आणि संवेदनशील मन , विश्व मानव त्यांचे प्रेरणादायी विचार, ज्यानी 39 वर्षे आयुष्यातील दहा वर्षे सार्वजनिक सेवेसाठी घातली. ज्ञानयोग,भक्तीयोग ,कर्मयोग आणि राजयोग ही त्यांनी दिलेली चार विचार शिल्पे याचा विचार मांडले.
या कार्यक्रमाची सुरुवात कु.जनाई तुकाराम धुमाळे या चिमुकलीने गायलेल्या स्वागत गीताने झाली. या नंतर झालेल्या चर्चेत उषाताई तोंडचीरकर, प्रा.वसंत मोरे यांनी सविस्तर असे विचार मांडले. यावेळी मुरलीधर जाधव यांनी युवकांसाठी स्पर्धा घेण्याचे आवाहन केले. आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलीचा समाधी सोहळा संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भंडारे शोभा यांनी सुंदर असे भक्तीगीत सादर केले.अध्यक्षीय समारोपात बालाजी सुवर्णकार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. संचलन बिरादार आनंद नरसिंगराव यांनी केले. तर आभार आदित्य भास्कर जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचा शेवट उषाताई तोंडचिरकर यांच्या पसायदान गायनाने करण्यात आला