महिलांमध्ये काही उपजत कौशल्य असतात. त्यांचा वापर करून महिलांनी स्वयंरोजगार किंवा लघुउद्योग सुरू करावा आणि अर्थाजन करून स्वतःबरोबरच कुटुंबालाही स्वावलंबी बनवावे, हा भागीरथी महिला संस्थेचा उद्देश आहे. त्यासाठी भागीरथीच्यावतीने प्रशिक्षण शिबिरे घेतली जात असून, शिबिरात सहभागी होणार्या प्रत्येक महिलेला तिचा उद्योग सुरू करण्यासाठी भागीरथी संस्था पाठबळ देईल, अशी ग्वाही संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी दिली. करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथं आयोजित प्रशिक्षण शिबिरावेळी त्या बोलत होत्या.
महिलांनी घरसंसार सांभाळतानाच विविध वस्तू किंवा खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन त्याद्वारे स्वावलंबी व्हावे, या हेतूने भागीरथी महिला संस्थेतर्फे प्रशिक्षण शिबिरं घेतली जातायत. करवीर तालुक्यातील सरनोबत वाडी इथं ही प्रशिक्षण शिबिर पार पडले. भागीरथीच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराला प्रारंभ झाला. महिला सबलीकरण याचा अर्थ केवळ महिलांनी उद्यमी व्हावे, असा नसून महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना वाचनासाठी प्रवृत्त करणे, स्वसंरक्षण करण्याचे धाडस त्यांच्या अंगी बाळगणे, महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणे, अशा विविध पातळयांवर भागीरथी संस्था कार्यरत असल्याचे सौ. महाडिक यांनी सांगितले. तर भागीरथी निधी बँके संदर्भात सुजाता कणसे यांनी मार्गदर्शन केले. महिला, शेतमजूर कारागीर अशा विविध घटकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे काम भागीरथी निधी बँक करणार असल्याचे कणसे यांनी सांगितले. त्यानंतर उपस्थित महिलांना प्रशिक्षिका अश्विनी वास्कर यांनी निल, फीनेल, वॉशिंग पावडर, सेंट, केक, अगरबत्ती, हॅन्ड वॉश,चौपाटी पदार्थ अशा अनेक वस्तू आणि खाद्यपदार्थांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या शिबिरावेळी अर्चना बिराजदार, सुप्रिया लाड, सुनंदा पाटील, नम्रता तेजम, संजीवनी सुर्वे, शितल तिरुके यांच्यासह भागीरथी संस्थेच्या सभासद उपस्थित होत्या