कागल, दि. १३:*देशात स्वच्छ भारत अभियान सुरू झाले तेव्हापासून कागल पालिकेला अनेक बक्षीसे मिळाली. पण; काही राजकीय कारणांमुळे काम चांगले असूनही अलीकडे पालिकेला बक्षीस मिळाले नाही. आता स्वच्छ सर्वेक्षणात कागलचा देशात एक नंबरच आला पाहिजे. यासाठी लागेल ते सहकार्य करण्याची तयारी आपली आहे, असे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.कागल नगरपरिषदेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत घेण्यात आलेल्या मिंगल्स, शॉर्ट मूव्हीज, पोस्टर, मुरल्स, ट्रीटप्ले व स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शाळा, स्वच्छ हॉस्पिटल, स्वच्छ सोसायटी, शासकीय कार्यालय व स्वच्छता चॅम्पियन्स व टेक्नॉलॉजी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरवडे, पालिकेचे मुख्याधिकारी श्रीराम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, भरघोस निधी आणून कागल शहराचा चेहरा -मोहरा बदलण्याचा प्रयत्न आपण केला आहे. आता ओला व सुका कचरा वेगवेगळा करून पालिकेला देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. शहरातील सर्व नागरिक एकत्र झाले तर स्वच्छ सर्वेक्षणात कागल पालिकेला देशात नंबर एक आणल्याशिवाय राहणार नाही. याचबरोबर शहर प्लास्टिकमुक्त करणेही गरजेचे आहे. मागील सात महिन्यात शहरात हरितपट्टे तयार केले आहेत. आता खड्डेमुक्त कागल अभियान सुरू करण्यात आले आहे. विकासकामे करून शहराचे सौंदर्य वाढवले आहे. स्वच्छ अभियानास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे म्हणाल्या, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांची विकासकामाची गती मोठी आहे. पालिकेचे काम कागल पालिकेसारखेच हवे, असे आम्ही बाहेर सांगत असतो. कागल शहराच्या विकासात आमदार श्री. मुश्रीफ यांचे मोठे योगदान असून शासकीय निधी खेचून आणण्यात त्यांचा हातखंडा आहे.मुख्याधिकारी श्रीराम पवार म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षणात कागलचा पहिल्या पंधरामध्ये क्रमांक आला. तो आता पहिल्या पाचमध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुका व ओला कचरा वेगवेगळा दिल्यास त्यावरती प्रक्रिया करणे सोपे होते. शहरात प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.स्पर्धेतील विजेत्यांना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते पारितोषिक व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.स्वागत आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. यावेळी स्वच्छतेबाबत संत रोहिदास विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.
कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, आर. के. पोवार, आदिल फरास, प्रा . डी. डी. चौगुले, प्रविण काळबर, विवेक लोटे यांच्यासह स्पर्धेतील विजेते, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*