वडकशिवाले, दि. १५:माझी आणि जनतेची नाळ घट्ट जुळली आहे. ही नाळ कुणीही तोडू शकणार नाही, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. जोपर्यंत जनता माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझ्या केसालाही धक्का लागणार नाही, असेही ते म्हणाले.
वडकशिवाले ता. आजरा येथे नूतन लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात आमदार श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आमदार श्री. पुढे म्हणाले, ज्यादिवशी बुधवारी दि. ११ ईडीचा छापा माझ्या घरावर पडला, त्याच्या आदल्या रात्री म्हणजेच मंगळवारी दि. १४ मी मुंबईला गेलो होतो. रेड पडल्याची माहिती समजताच हजारो लोक त्यादिवशी रस्त्यावर आले. दिवसभर तसेच तो छापा संपेपर्यंत हजारो लोक १४ तास थांबून राहिले. त्यानंतर, मी मुंबईवरून येऊन आता चार दिवस झाले आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत हजारो लोक भेटायला येत आहेत. लोकांच्या रांगाच तुटत नाहीत. हे काही माझे तीन-चार वर्षांचे ऋणानुबंध नव्हेत. आमदारकीची २५ वर्ष आणि त्याआधीची समाज जीवनातील दहा वर्षे अशी ३५ वर्षे मी समाजजीवनात घालवलेली आहेत. जनतेशी ही नाळ आणि ऋणानुबंध असं कुणीतरी तोडून तुटणार नाहीत. म्हणूनच जोपर्यंत जनता माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझ्या केसालाही धक्का लागणार नाही, असेही ते म्हणाले.