कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज या सामाजिक संस्थेला २०२१-२०२२ या सालामध्ये २५ वर्ष पूर्ण झाले आहेत.रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज ही एक सामाजिक संस्था म्हणून कोल्हापूरमध्ये ओळखली जात असून या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये या संस्थेने आतापर्यंत अनेक विधायक कामे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत.व सध्याही अनेक उपक्रम राबविले जात आहेत.मागील वर्षी रोटरी वर्ष २०२१-२०२२ या कार्यकालमध्ये या सामाजिक संस्थेच्या कार्यकारिणीने विविध कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली होती. त्याची पूर्तता या २०२३ वर्षांमध्ये होत आहे.यात
रोटरी सनराईज या संस्थेच्या वतीने १८ जानेवारीला स्वयंम शाळेस ई लर्निंग व सेन्सरी गार्डन उभारणी ,डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभाग व मणक्यावरील शस्त्रक्रिया मशीन प्रदान केले जाणार आहे.या सर्व उपक्रमांचे उदघाटन कार्यक्रम होत आहेत अशी माहिती माजी अध्यक्ष सचिन मालू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
१८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता रोटरी सनराईज यांच्या वतीने कसबा बावडा येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी कोल्हापूर शाखा संचलित स्वयंमशाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पंधरा लाख रुपये खर्च करून ई लर्निंगची सुविधा शाळेतील आठ वर्गांकरिता उपलब्ध करून दिली जात आहे.ज्यात लॅपटॉप, टीव्ही, सॉफ्टवेअर अशा साहित्याचा समावेश आहे. शिवाय याच शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या
शारीरिक व बौद्धिक विकास होण्याच्या दृष्टीने शाळेच्या आवारात
सुसज्ज असे विविध उपकरणांचा समावेश असलेले भव्य असे उद्यान (सेन्सर गार्डन) उभे केले गेले आहे. या ई लर्निंग व उद्यान उपक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावर यांच्या हस्ते होणार आहे.
याच दिवशी डॉक्टर डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कदमवाडी येथे व्हेंटिलेटर, बेबी वॉर्मर, इनक्यूबेटर, फोटोथेरेपी अशा अत्याधुनिक मेडिकल साहित्यांचा समावेश असणारे “शिशुरक्षा” या नावाने नवजात शिशु विभाग याठिकाणी तयार करण्यात आला आहे. हा उपक्रम रोटरी फाउंडेशन व मॉरिशीस येथील रोटरी क्लब आणि कोल्हापुरमधील रोटरी सनराईज यांच्या संयुक्त प्रयत्नांनी ७५ लाख रुपये खर्च करून ग्लोबल ग्रँट उपक्रमांतर्गत हा विभाग साकारला गेला आहे.शिवाय हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्यांना माफक दरामध्ये मणक्यावरील शस्त्रक्रियेवरील उपचार घेता यावेत यासाठी रोटरी सनराइज तर्फे ४० लाख रुपयांची उपकरणे हॉस्पिटलला दिली जात आहेत.या उपक्रमाचे उद्घाटन प्रो.डॉ. जी.व्ही.बसवराजा (नॅशनल प्रेसिडेंट ऑ इंडियन अकॅडमी ऑफ पेडियट्रिकस बेंगलोरु) यांच्या हस्ते कार्यक्रम दुपारी ३ वाजता हॉस्पिटलमध्ये होणार आहे.
संस्थेमध्ये १२१ सभासद असून कसबा बावडा येथे या संस्थेची स्वतंत्र इमारत आहे.याठिकाणी संस्थेचे कामकाज चालते.या संस्थेच्या २५ व्या वर्ष पूर्तीनिमित पाच इंटरनॅशनल ग्लोबल ग्रँट प्रकल्प, सीएसआर फंडिंग मार्फत दोन सामाजिक उपक्रम, प्रकल्प व सभासदांच्या फंडातून पाच सामाजिक उपक्रम संस्थेने आतापर्यंत राबविलेले आहेत. त्यातील काही मोठे प्रकल्प सध्या क्लबच्या संकल्पनेतून पुढे आले असून त्याचे काम २०२१-२०२२ सालामध्ये सुरुवात झाली असून १८ रोजी पूर्ण होत आहे. संस्थेने जे काही स्वप्न पाहिले होते ते स्वप्न आता पूर्ण होत असून या प्रकल्पांची पायाभरणी करून ज्यांच्यासाठी हे प्रकल्प राबविलेले आहेत. त्यांना ते रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने उद्घाटन करून सुपूर्त केले जाणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यासाठी रोटरी सनराईजतर्फे माजी अध्यक्ष सचिन मालू व सचिव दिव्यराज वसा आणि इतर क्लबचे पदाधिकारी व सदस्य यामध्ये विक्रांत सिंह कदम, प्रसन्न देशिंगकर, राहुल.आर. कुलकर्णी, सचिन झंवर,राजूभाई परीख,चंद्रकांत राठोड, इंद्रजीत दळवी, डॉ. सचिन पाटील यांचे याला मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभले आहे.
तर या उद्घाटन समारंभास सध्याचे अध्यक्ष ऋषिकेश खोत, व सचिव राहुल.एस. कुलकर्णी, यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. या पायाभरणी व हस्तांतरण कार्यक्रमास रोटरी इंटरनॅशनल व रोटरी जिल्हा ३१७० तर्फे माजी प्रांतपाल गौरीश धोंड, विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे व भावी होणारे प्रांतपाल नासिर बोरसदवाला, शरद पै, अरुण भंडारे व माजी सहाय्यक प्रांतपाल करुणाकर नायक व विद्यमान सहाय्यक प्रांतपाल सुभाष कुत्ते, डिस्ट्रिक्ट ऑफिसर अजय मेनन आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी अध्यक्ष सचिन मालू यांनी दिली आहे.आणि सर्व गरजू जनतेने या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला दिव्यराज वसा,विक्रांतसिह कदम,प्रसन्न देशिंगकर,राहुल.आर. कुलकर्णी,अध्यक्ष ऋषिकेश खोत,सचिव राहुल एस. कुलकर्णी आदी उपस्थित होते.