राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या नेतेमंडळी, ऊमेदवार व कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक
कोल्हापूर, दि. २०: कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची वरदायिनी आहे. या निवडणुकीत एकजुटीने ऐतिहासिक विजय घडेल, असा विश्वास आमदार विनयराव कोरे यांनी व्यक्त केला. राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या नेतेमंडळींसह उमेदवार व कार्यकर्त्यांच्या प्राथमिक बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार पी. एन. पाटील होते.भाषणात आमदार श्री. कोरे म्हणाले, समस्त शेतकऱ्यांच्या कल्याणकारी हिताच्या दृष्टिकोनातूनच राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी साकारलेली आहे. चांगलं घडत असतानाही काहींनी ते बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या निवडणुकीत अशा प्रवृत्तींना निश्चितच धडा मिळेल. या एकजुटीचे फलित निवडणुकीच्या निकालात निश्चितच दिसेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ए. वाय. पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, केडीसीसी बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अमरीशसिंह घाटगे, खासदार सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संचालक ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, पंडितराव केणे, गोकुळ दूध संघाचे संचालक प्रा. किसन चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, निवडणूक प्रचारासाठी अत्यंत कमी अवधी असल्यामुळे सर्वच उमेदवारांनी प्रचाराचे काटेकोर नियोजन करावे. कार्यक्षेत्रातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा आणि राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीची विकासात्मक आणि विधायक भूमिका पटवून सांगा, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य अमरीशसिंह घाटगे यांनी आभार मानले.