कोल्हापूर, ता. ३ – आनंदस्वरूप श्रीकृष्ण सर्वांना सुंदर जीवनाचा आनंद देत असल्याचे सांगत आपल्या सुश्राव्य वाणीने भाविकांना कथेत गुंतवण्याचे काम मयूर कुलकर्णी गुरुजी यांनी केले.
येथील व्हीनस कॉर्नर येथील लक्ष्मी नारायण मंदिरात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले आहे. यामध्ये तिसऱ्या दिवशी प्रल्हाद चरित्रातून भगवंताचे भक्तांवरील प्रेम, वर्णाश्रम धर्मातून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या चार वर्णाबरोबर ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम याचे तर्कशुद्ध व व्यावहारिक निरूपण केले. गजेंद्र मोक्षाच्या कथेतून भगवंताचे कारुण्य विस्तृत केले. समुद्र मंथनातून भगवंताच्या दिव्य लीलांचे दर्शन घडविले. वामन अवतारातील बली चक्रवती यांच्यावर भगवंताची असलेली कृपा दाखवून दिली. राजा सत्यव्रताचे सत्व मत्स्य अवतारातून उलगडले. एकादशी व्रतांचे महत्त्व अंबरीश राजाच्या कथेतून दाखवून दिले. रामायणातील कथा सांगत असताना भाविक मंत्रमुग्ध होऊन भारावून गेले.
निरुपणामध्ये देव, धर्म आणि राष्ट्रनिर्मितीचे धडे हास्यमय उदाहरणातून तसेच प्रत्यक्ष आयुष्यातील दृष्टांतातून देण्यात आले. अध्यात्म व धर्म याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन देण्यात आला. श्री परशुराम कथेतून व्यवहार ज्ञान व भगवंताच्या लीला कथन केल्या.
दिवसातील महत्त्वपूर्ण प्रसंग होता तो म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मोत्सव. यामध्ये देखाव्याच्या माध्यमातून जन्म सोहळ्यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रात्री सुगम स्वराभिषेक मंडळ व इस्कॉनतर्फे भजनाच्या माध्यमातून वातावरण प्रफुल्लित व जोषमय झाले. पुष्प आणि मिठायांच्या बरसातीमध्ये बेभान होऊन नाचणाऱ्या वृंदांना पाहून प्रत्यक्ष वृंदावन अवतरले असा भास झाला. श्रीकृष्णाच्या पाळण्याची पूजा, भजन, नामकरण सोहळा होऊन विशेष ५६ भोगाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्ष श्रीनिवास मालू, उपाध्यक्ष मनीष झंवर, सचिव राजेंद्र शर्मा, सुभाष मुंदडा, अशोक अग्रवाल, लक्ष्मीनिवास बियाणी, संजय तोतला यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.