दसरा चौकात राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रे व पत्रव्यवहाराचे प्रदर्शन
कोल्हापूर, दि. १७:भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानदिव्यत्वाची प्रचिती. त्यांची दुर्मिळ छायाचित्रे आणि पत्रव्यवहार डिजिटायझेशन करून जतन करून ठेवू, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ही दुर्मिळ छायाचित्रे आणि पत्रव्यवहार थक्क करणारा आहे, असेही ते म्हणाले.
कोल्हापुरात दसरा चौकामध्ये श्री राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मिळ छायाचित्रे व पत्र व्यवहाराच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत सौ. मधुरीमाराजे छत्रपती होत्या. स्मृतीशेष रणजीत सांगावकर यांचे स्मृतीप्रित्यर्थ लिंगनूर (कापशी) ता. कागल येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्वयंरोजगार संस्थेच्यावतीने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
भाषणात पालकमंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, प्रदर्शनात मांडलेली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्व छायाचित्रे व पत्र व्यवहार हे महत्त्वाचे दस्त आहेत. अनंत अडचणीतून ते प्राप्त झालेले आहेत. ते संपूर्ण भारतभर पोहोचविण्यासाठी त्यांचे संगणकीकृत जतन होणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आर्थिक नियोजन करू.
जाग्यावरच सूचना……..!
प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मिळ छायाचित्रे व पत्रव्यवहार आहेत. ते डिजिटायझेशनच्या रूपात जतन होण्यासाठी लागेल तो खर्च जिल्हा नियोजन मंडळातून देण्याचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी जाहीर केले. व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांना त्यांनी भाषणातच तशा सूचनाही दिल्या.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, नंदकुमार गोंधळी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, संदीप सांगावकर, दिलीप सांगावकर, दुग्ध विभागाचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, पीआरपी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डी. जी. भास्कर, प्रकाश लिंगनूरकर, विकी महाडिक, बंटी सावंत, दयानंद कांबळे, दिलीप कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.