कोल्हापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी शाश्वत भारत सेतू- विनिंग नेट झिरो या केंद्राचे उद्घाटन नागपूरमध्ये केले. हे केंद्र द इको फॅक्टरी फाउंडेशनने विकसित केले आहे. लोकांपासून पृथ्वीपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशा शाश्वत जीवनशैली, उपाय आणि पद्धतींना समर्पित असे अतिप्रगत अनुभव हे केंद्र देते. यातून नेट झिरो इंडिया अर्थात शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने जाण्यात मदत होऊ शकते.
द इको फॅक्टरी फाउंडेशनचे संस्थापक आनंद चोरडिया यांनी वेस्ट टू वेल्थ, जल व्यवस्थापन, ऊर्जा बचत यांसारख्या अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याद्वारे होणारे कार्बन उत्सर्जन कसे कमी करावे, चक्राकार अर्थव्यवस्थेचे महत्त्व तसेच ग्रामीण, शहरी, औद्योगिक व व्यक्तिगत विभागांत शाश्वतता कशी साध्य करावी हेही स्पष्ट केले आहे. व्यापक स्तरावर शून्य उत्सर्जन कसे साध्य करावे यावर त्यांनी भर दिला.
श्री. नितीन गडकरी म्हणाले, अशा प्रकारचे अपवादात्मक दर्जाचे केंद्र सुरू केल्याबद्दल द इको फॅक्टरी फाउंडेशनचे खूप अभिनंदन. शाश्वत भारत सेतूने अगदी महत्त्वाच्या मुद्दयाला स्पर्श केला आहे. त्यामुळे आपल्या पर्यावरणाचे आणि पर्यायाने वसुंधरेचे संवर्धन होणार आहे. शाश्वत भारत सेतूने ‘वेस्ट टू वेल्थ’ या संकल्पनेने उदाहरण घालून दिले आहे. केवळ पर्यावरणाला लाभदायक ठरणारे नाहीत, तर समुदायांसाठी उपजीविकेच्या संधीही निर्माण करणारे शाश्वत उपाय हे केंद्र पुरवणार आहे. नेट झिरो उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योगदान देण्याच्या दृष्टीने हे केंद्र संपूर्ण राष्ट्राला प्रेरित करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
टीईएफएफचे संस्थापक आनंद चोरडिया म्हणाले, प्रत्येकाला शून्य कार्बन उत्सर्जन करणारी तसेच शाश्वत जीवनशैली सहजतेने स्वीकारण्याची प्रेरणा देण्याच्या तसेच त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या आमच्या ध्यासाची चालना शाश्वत भारत सेतू-विनिंग नेट झिरो हे केंद्र विकसित करण्यामागे होती. शाश्वत भारत सेतू हा खऱ्या अर्थाने भारताला शून्य कार्बन उत्सर्जनाकडे घेऊन जाणारा पूल आहे असे मला ठामपणे वाटते. हे केंद्र खूप जणांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना प्रेरित करेल अशी आशाही आम्हाला वाटते, जेणेकरून हे सर्व जण शाश्वत भविष्यकाळाकडे जाणाऱ्या प्रवासात सहभागी होऊ शकतील.