संकेतस्थळ किंवा मोबाईल ऍप द्वारे मतदार यादीतील आपल्या नावाची नागरीकांनी खात्री करावी – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर,: सक्षम लोकशाहीसाठी प्रत्येक नागरीकाने निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविणे व नैतिकतेने मतदान करणे ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. आपण व आपले कुटुंबातील सदस्य, आपले परिचय, आपला मित्र परिवार, आपले शहरातील, जिल्ह्यातील व राज्यातील सर्व पात्र प्रौढ नागरीक मतदान प्रक्रियेत सहभागी झाले तर आपले लोकप्रतिनिधी निवडण्याची आदर्श प्रक्रिया राबविली जाऊन लोकशाहीचा पाया भक्कम करण्यामध्ये आपण मोलाची भूमिका बजाऊ शकतो, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
यासाठी आपण आपल्या दैनंदिन कामकाजातून केवळ एक तास दिल्यास मतदार यादीमध्ये आपले व आपल्या परिवारातील सदस्यांचे नाव असल्याची खात्री करून घेता येईल व मतदान प्रक्रियेत सहभागी होता येईल. आपले नाव मतदार यादीत आहे का हे पाहण्यासाठी आपण कुठल्याही निवडणूक कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline या अॅपवर अत्यंत सुलभतेने नाव असल्याची खात्री करता येते, तसेच मतदार यादीत आपले नाव नसल्यास अथवा तपशिलात काही चूक झाली असल्यास अर्ज करता यईल.
नमुना क्रमांक ६ मतदार यादीत नांव सामाविष्ट करावयासाठी अर्ज, नमुना क्रमांक ७ मतदार यादीतील नावाची वगळणी करावयासाठी अर्ज, नमुना क्रमांक ८ मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी तसेच मतदार यादीतील आपले नाव एका भागातून दुस-या यादी भागात स्थलांतरीत करण्यासाठी अर्ज आहे. नागरीकांनी आपले आवश्यकतेप्रमाणे वरील नमुण्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा संबंधित तालुक्यातील तहसिल कार्यालय (निवडणूक शाखा) व कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये रहिवाशी असलेल्या मतदारांनी एल. बी. टी. शाखा, शिवाजी मार्केट, कोल्हापुर महानगरपालिका, कोल्हापूर यांच्याकडे सादर करावेत किंवा आयोगाने विकसित केलेल्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर आज्ञावलीवर अथवा Voter Helpline App या अॅपवर ऑनलाईन पध्दतीने सादर केल्यानंतर त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे.
आपण आपल्या बहुमूल्य वेळेतील एक तास देऊन आपल्या व आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे मतदार यादीत असलेबाबत जिल्ह्यातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरीकांना खात्री करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.