(उदगीर, प्रतिनिधी). माणसाचा मूल्य विवेक उन्नत करते ती श्रद्धा असते, जी मूल्य विवेक अवनत करते ती अंधश्रद्धाच असते. श्रद्धा ही व्यक्ती सापेक्ष आणि कालसापेक्ष असते, म्हणूनच तर श्रद्धेची व्याख्या देखील व्यक्ती परत्वे वेगवेगळी बनते. व्यक्तींच्या विचारावर भावनांचे प्रभुत वाढले की माणूस अंधश्रद्ध होतो मग श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा जोपासतो आणि भावनेवर विचाराचे प्रभुत्व वाढले की माणूस विवेकी बनतो. तेंव्हा श्रद्धेची चिकित्सा झाली पाहिजे. उपलब्ध ज्ञानाला अनुभवाच्या आधारे तपासले असता, जी टीकते ती श्रद्धा आणि जी टिकत नाही ती अंधश्रद्धाच असते. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनातल्या भावनिक वादळावरील व्यापक वैचारिक भूमिकेसंदर्भाने सविस्तरपणे चर्चा करणारी साहित्यकृती म्हणजे श्रद्धा-अंधश्रद्धा होय. असे मत माधव बावगे यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात, उदगीर आयोजित वाचक संवादाचे ३११ वे पुष्प माजी ग्रंथपाल बाबुराव माशाळकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष, मा.माधव बावगे यांनी डॉ.नरेंद्र दाभोळकर लिखित श्रद्धा- अंधश्रद्धा या साहित्यकृतीवर बोलताना चला कवितेच्या बनत या वैचारिक, सातत्यपूर्ण उपक्रमाचे भरभरून कौतुक करून पुढे म्हणाले की, बुवाबाजी , करणी भानामती, फल ज्योतिषाचे थोतांड, श्रद्धा व अंधश्रद्धा यांचे पुरेसे विवेचन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि श्रद्धेच्या अंगानं जोडलेलं व्यापक वैचारिक भूमिकेशी नशीब, नियती, प्रारब्ध, दैव आणि संचित यांचं नातं या विषयाची चर्चा या पुस्तकात करण्यात आलेली आहे. अंनिस ची व्यापक वैचारिक भूमिका, नीती विचार, महिला व अंधश्रद्धा निर्मूलनाबाबतचे स्वरूप , कारणे आणि उपाययोजना यांचा वापर मन आणि मनाचे आजार यांची मनोवैज्ञानिक माहिती या पुस्तकात दिलेली आहे असे सांगत त्यांनी स्वतःचे अनुभव वाचकांसमोर ठेवून वस्तुस्थितीवर भाष्य करीत श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरेही दिली.
अध्यक्षीय समारोपात ग्रंथपाल बाबुराव माशाळकर म्हणाले, ज्ञान संवर्धनाच्या दृष्टीने वाचक संवाद हा उत्कृष्ट उपक्रम आहे. समाज परिवर्तनासाठी अशा उपक्रमाची गरज आहे. समाजातील अंधश्रद्धेला मानसिक दुर्बलता कारणीभूत असते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद सावरगावे यांनी केले, संवादकांचा परिचय डॉ.म.ई.तंगावार यांनी करून दिला तर आभार तुळशीदास बिरादार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचक संवादाचे संयोजक अनंत कदम, प्रा.राजपाल पाटील, आनंद बिरादार, मुरलीधर जाधव इत्यादींनी प्रयत्न केले. सदरील कार्यक्रमास शहरातील वाचक रसिकश्रोते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.