कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपला मोठा धक्का बसून अखेर जि.प.वर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाविकास आघाडीचा झेंडा फडकला.
आज झालेल्या निवडणूकीत अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी चे सतीश पाटील विजयी झाले.तर विरोधी भाजपचे आघाडीचे उमेदवार अरुण इंगवले यांना पराभव स्विकारावा लागला.राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये यशस्वी झाल्याने भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावे लागले.निवड प्रक्रियेवेळी पीठासन अधिकारी म्हणून करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी काम पाहिले.यावेळी शिवसेनेचे १० सदस्य तर गेल्या दोन दिवसापासून चर्चेत असलेल्या आमदार पी.एन.पाटील यांच्या समर्थकांनीही जि.प.मध्ये दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्याने अखेर सत्तांतर झाले.
जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आज सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर २ वाजता सभेच्या प्रारंभी आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करुन उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिल्यानंतर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.यावेळी भाजपच्या विजय भोजे यांनी मतदान केले नाही तर राष्ट्रवादीचे जीवन पाटील गैरहजर राहिले.अंबरीश घाटगे यांनी भाजप विरोधात मतदान केले तर रेश्मा देसाई यांनी महाविकास आघाडीला मतदान केले.तर राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न येथे ही यशस्वी झाला.दरम्यान महाविकास आघाडीतून काँग्रेसचे बजरंग पाटील यांना ६५ पैकी ४१ मते पडल्यामुळे पाटील १७ मतांनी विजयी झाले. तर विरोधी भाजप आघाडीचे उमेदवार अरुण इंगवले यांना २४ मते मिळाल्याने पराभव पत्कारावा लागला
त्यामुळे जिल्हापरिषेवर ३ वर्षांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकला.निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण ,फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुक २०२०
पक्षीय बलाबल
कॉग्रेस -१४
राष्ट्रवादी -१०
शिवसेना -१०
शेतकरी संघटना -०२
शाहू आघाडी _ ०२
अपक्ष -०१
चंदगड विकास आघाडी- ०१
ताराराणी आघाडी – ०१
एकूण -४१
__
भाजप आघाडी
भाजप -१३
आवाडे गट -०२
चंदगड युवक क्रांती आघाडी- ०१
जनसुराज्य – ०६
ताराराणी आघाडी ०२
एकूण -२४