कोल्हापूर/प्रतिनिधी
बदलत्या समाज माध्यम आणि वेब माध्यमाच्या दुनियेत वृत्तपत्रांनीही स्वत:मध्ये बदल केला आहे. माणसाला मरण आहे. घटनेला मरण आहे. परंतु अक्षराला आयुष्य असतं. विश्वाच्या अंतापर्यंत लिखित स्वरूपातील माहिती टिकणार आहे. त्यासाठी वृत्तपत्रांची विश्वासार्हता ही कायम राहणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने मराठी पत्रकार दिन आज साजरा करण्यात आला. सुरूवातीला आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला श्री. सातपुते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, उपाध्यक्ष महेश काशिद, कार्यवाह शेखर पाटील, सहकार्यवाह गुरूनाथ भादवणकर उपस्थित होते. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी यांना श्री. सरस्वती वाचनालयाचा बेळगाव भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल संघाच्यावतीने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या पत्रकारितेचा ओझरता उल्लेख करत बदलणाऱ्या माध्यमांविषयी बोलताना श्री. सातपुते म्हणाले, खादीच्या शबनम बॅगेपासून सुरू झालेला प्रवास सध्या समाज माध्यमांपर्यंत आला आहे. प्रत्येक टप्प्यावर पत्रकारितेनेही बदल अंगिकारला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या उदयानंतर प्रचलित मुद्रित माध्यमांवर आक्रमण होतय की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. परंतु त्यानंतरही वेब दुनिया आणि समाज माध्यमांच्या सध्याच्या प्रवाहात छपाई माध्यमांनीही स्वत:मध्ये बदल केला आहे. विविध वृत्तपत्रांनी आपल्या मुद्रित अंकासोबत संकेतस्थळ, वेबआवृत्ती, ॲप्लीकेशन्स या माध्यमातून स्वत:ला सिध्द केले आहे. समाज माध्यमांवर येणारी माहिती ही खरी असेलच असे नाही. त्यासाठी त्या माहितीच्या खात्रीसाठी मुद्रित माध्यमांचा आधार घ्यावा लागतो हे या माध्यमांचं यश आहे. समाज माध्यमांवर आलेल्या माहितीची खात्री संबंधित सक्षम यंत्रणेकडून झाल्याशिवाय ती पुढे पाठवू नये.
सीमा भागातील मराठी वृत्तपत्रांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत मराठी भाषेचा जागर करत आपली पत्रकारिता वृध्दिंगत केली आहे. याबद्दल आपले मनापासून आभार. आपल्या विविध मागण्यांबाबत महाराष्ट्र शासन निश्चितपणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री. याळगी यांनी सत्काराला उत्तर देताना जुन्या आठवणी सांगून कृतज्ञता व्यक्त केली. सुरूवातीला वैष्णवी काकतीकर हिने स्वागत गीत म्हटले. राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत प्रणव अध्यापक याने तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्याचा सत्कार पत्रकार विलास अध्यापक यांनी स्वीकारला. रणझुंजारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यवाह श्री. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. शहापूरकर यांनी यावेळी स्वागत प्रास्ताविक केले. तर सुहास हुद्दार यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, पत्रकार मनोहर कालकुंद्रीकर, अनंत लाड, राजेंद्र पवार, प्रकाश बेळगोजी, संजय चौगुले, शिवराज पाटील आदीसह संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.