कोल्हापूर /प्रतिनिधी
धमाल ,विनोदी आणि निखळ मनोरंजन करणारा “चोरीचा मामला”चित्रपट येत्या ३१ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नुकताच चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडीयाद्वारे लाँच करण्यात आला असल्याची माहिती चित्रपटातील कलाकारांनी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत दिली.
दमदार स्टारकास्ट आणि पुरेपूर मनोरंजन करणारं कथानक असलेल्या चोरीचा मामला या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून अल्पावधीतच या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरुप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, स्मिता ओमाळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि हरीश कस्पटे यांनी चित्रपटाची पटकथा, संवाद लेखन केले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव यांनी केलं आहे.शब्बीर नाईक यांनी छायांकन तर निलेश गावंड यांनी संकलन केले आहे.कला दिग्दर्शक म्हणून सतीश चिपकर आणि सुजित कुमार यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग अशी स्टारकास्ट या चित्रपटात आहेत. एका चोरीमुळे होणारी गुंतागुंत या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटाची संकल्पनाच मजेशीर आहे, त्यात प्रासंगिक विनोद, खुमासदार संवादांचा तडका या कथानकाला मिळाला आहे. त्याशिवाय ताल धरायला लावणारं संगीत हेही चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. जितेंद्र जोशी, मंगेश कांगणे, जय अत्रे यांनी चित्रपटाची गाणी लिहिली असून चित्रपटाचे संगीत चिनार महेश यांचे आहे तर चित्रपटाचे शीर्षक गीत स्वप्नील प्रफुल्ल यांचे आहे. शाल्मली खोलगडे, प्रियांका बर्वे, चिनार खारकर, स्वप्नील गोडबोले, कविता राम यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. या चित्रपटामुळे प्रेक्षकांना पूरेपूर मनोरंजन मिळणार हे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.दरम्यान येत्या ३१ जानेवारीला हा धमाल, विनोदी असा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे असून सर्वांनी चित्रपटगृहात जावून या चित्रपटाचा आनंद घ्यावा असं आवाहन यावेळी चित्रपटातील कलाकारांनी केलयं.