कोल्हापूर /प्रतिनिधी
राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी कर्जमाफी असून यामधील जाचक अटीमुळे राज्यातील ९५ टक्के शेतकरी या कर्जमाफी पासून वंचित राहणार आहेत.त्यामुळे सरकार स्थापन होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापूरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.यावेळी कसलं सरकार…फसवं सरकार,शेतकऱ्यांचा सातबारा कोरा.. झालाचं पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे आदी
घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान सदर मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.
मोर्चाची सुरुवात दसरा चौकातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून करण्यात आली. मोर्चा दसरा चौक,व्हिनस कार्नर मार्गी जिल्हाधिकारी येताच सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.तर प्रतिकात्मक फाशी मोर्चाचे आकर्षक ठरले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर,प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या मनोगतातून शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त करत सरकारवर जोरात टीकास्र सोडले. दरम्यान सदर मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.यावेळी महाविकास आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असून तात्काळ शासन निर्णय काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी सह शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अन्यथा भाजप गप्प बसणार नसून सरकार विरोधात तीव्र आंदोलन करुन वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आलायं.
मोर्चात माजी आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव,महानगर जिल्हा अध्यक्ष राहूल चिकोडे,भरमूआण्णा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भगवान काटे, बाबा देसाई यांच्या सह भाजपचे कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.