कोल्हापूर: जिल्ह्यातील वाढत्या रूग्णसंख्येचा विचार करुन बुधवारपासून (ता. 5 मे पासून जिल्ह्यात 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी यासंबंधी निर्णय घेतला.
जिल्ह्यात वाढणारी कोरोना रूग्णसंख्या त्याप्रमाणात प्राणवायू आणि रेमडेसिव्हीरची भासणारी कमतरता आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत दहा दिवसाचा कडकडीत लॉकडाऊन पुकारण्यासंबंधी तीनही मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे दूरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले,जिल्ह्यामध्ये सद्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रूग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. वाढती रूग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी बुधवारी सकाळी वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन करावा..
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, ‘गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्ह दर कमी नाही. जिल्ह्यातील २४०० रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्हयातून पुरवला जात आहे.’