कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेला पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा एजन्सी नेमून अंदाजित रक्कमेसह अंतिम आराखडा तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहूजी सभागृहात पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण सुक्ष्म कृती आराखड्याबाबत आढावा बैठक झाली. पालकमंत्री श्री. पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा समावेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने आराखड्यात करावा. त्याचबरोबर इचलकरंजीसाठी झेडएलडीचा प्रकल्प, संबंधित नगरपरिषद, गावे यांची गरज लक्षात घेवून आराखड्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याबाबत समावेश असावा. यासाठी प्रदूषण नियमंत्र मंडळाने एजन्सी नेमावी आणि या एजन्सीच्या माध्यमातून अंदाजित रक्कमेसह अंतिम आराखडा तयार करावा.
खासदार श्री. माने म्हणाले, इचलकरंजी येथील झेडएलडी प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्याचा सहभाग असणारी योजना असावी. त्याचबरोबर कोणते तंत्रज्ञान वापरणार याचा समावेश असावा. एकूणच महसूल निर्माण करण्याचं मॉडेल या आराखड्याच्या माध्यमातून तयारा करावं.
आमदार श्री. आवाडे म्हणाले, इचलकरंजीतील नवीन प्रक्रिया प्रकल्पाबाबत, नागरी विषयावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढावा. आमदार श्री. जाधव म्हणाले, एसटीपी प्रकल्पाचा दर्जा निवडण्याची आवश्यकता आहे त्यावर जास्त लक्ष द्यावे. आमदार श्री. पाटील ग्रामपंचायतींचे क्रस्टर मंजूर आहेत. कोणत्या ग्रामपंचायती याबाबत कमी पडत असतील तर त्याबाबत सांगावे. लक्ष घालून प्रकल्प पूर्ण करावा.
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, संबंधित नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्याबाबत सूचवावे. म्हणजे आराखड्यात त्याचा समावेश करता येईल. सर्वांच्या सूचनांचा समावेश करुन अंदजित रक्कमेसह हा आराखडा पूर्ण करण्यात येईल.
समिती सदस्य उदय गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. याबैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, जिल्हा प्रशासन अधिकारी दिपक पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे उपस्थित होते.