कोल्हापूर ता.06 : प्राथमिक व माध्यमिक शाळेकडील 38 शिक्षक आपत्कालीन व्यवस्था विभागात गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. कोवीडमध्ये अत्यावश्यक सेवा असतानाही प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता हे कर्मचारी गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांनी या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.
शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता महापालिका विविध उपाय करत आहे. प्रशासनामार्फत शहरातील विभागीय कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वॉर रुम, अलगीकरण व विलगीकरण कक्ष या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था विभाग सुरु केला आहे. या विभागात अत्यावश्यक सेवा बजावणेसाठी शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. लसीकरण डाटा संकलन, स्बॅब डाटा संकलन, सर्व्हेक्षण, कोविड पॉझेटिव्ह नागरिकांची चौकशी, ऍ़न्टीजेन्ट टेस्ट डाटा संकलन, वॉररुम मार्फत शहरातील बेड उपलब्धते माहिती गरजू नागरिकांना देण्याचे काम त्यांना दिले आहे.
प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळेकडील 38 शिक्षक अत्यावश्यक सेवा असतानाही प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता आपत्कालीन व्यवस्था विभागात गैरहजर असलेचे निदर्शनास आले आहे. या शिक्षक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 च्या शिस्तभंगाची व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथ नियंत्रण अधिनियम 1897 व महाराष्ट्र कोव्हिड उपाययोजना नियम 2020 मधील तरतूदीनुसार शिस्तभंगाची कारवाई का करणेत येवू नये म्हणून उप-आयुक्त रविकांत आडसुळ यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधीतांनी या नोटीसीचा लेखी खुलासा 24 तासात देवून नियुक्त केले ठिकाणी हजर रहाणेबाबत आदेश दिले आहेत. यापुढेही आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात येतील. त्या शिक्षकांनीही येथून पुढे नियुक्तीचे ठिकाणी तात्काळ हजर होवून कोरोना योध्दा म्हणून कर्तव्य बजावणेच्या सुचना दिलेल्या आहेत.