कोल्हापूर दि.२३ एक देश,एक विधान,एक निशाण,एक प्रधान देशाच्या ऐक्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे थोर राष्ट्रभक्त, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.शामा प्रसाद मुखर्जी यांना भाजपा जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले. भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव व भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या हस्ते डॉक्टर शामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी संघटन सरचिटणीस अशोक देसाई व सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी डॉक्टर शामा प्रसाद मुखर्जी यांच्या “प्रखर राष्ट्रवादाची कल्पना” या विषयावर विचार व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यासाठी तळमळीने झटणारे आणि त्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे नेते म्हणजे डॉ.शामा प्रसाद मुखर्जी होय. पाकिस्तान प्रमाणेच काश्मीरही भारतापासून तोडायची इच्छा ठेवणाऱ्या शेख अब्दुल्लांना डॉक्टर मुखर्जी यांनी कडाडून विरोध केला. ‘एक देश में दो विधान, दो प्रधान और दो निशान नहीं चलेंगे’ ही प्रसिद्ध घोषणा देणाऱ्या शामा प्रसादजींनी कायमच भारताच्या सार्वभौमत्वासाठी लढा दिला. स्वातंत्र्याआधी बंगाल फाळणीला केलेला विरोध असुदे किंवा काश्मीरला देण्यात आलेल्या विशेष दर्जा विरोधात उचलेला आवाज असुदे. शामा प्रसादजींनी कधीच राष्ट्रवादाशी तडजोड केली नाही.
भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, संघटन हा भारतीय जनता पार्टीचा आत्मा असून लहान मिटिंग, सातत्याने प्रवास यातून संघटन वाढवणे हेच उद्धिष्ट ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने कार्यरत राहून डॉ.शामा प्रसाद मुखर्जी यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत असे सांगितले. जीव ओतून काम करणे हा त्यांचा स्वभावातला एक महत्वाचा घटक होता. भाषणातील मुद्देसूदपणा, अवघड विषय समजावून सांगण्याचे कौशल्य अशा विविधांगी व्यक्तीमत्वाचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत डॉ.शामा प्रसाद मुखर्जी यांचे राष्ट्रभक्तीचे विचार सांगणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज शहरातील सात मंडलांमध्ये डॉ.शामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन कार्यक्रम संपन्न झाले.
याप्रसंगी सरचिटणीस हेमंत आराध्ये, उपाध्यक्ष मारुती भागोजी, राजू मोरे, संजय सावंत, विजय आगरवाल, सचिन तोडकर, किशोरी स्वामी, गायत्री राउत, अजित ठाणेकर आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.