उदगीर,: ज्ञानाच्या प्रामाणिकपणे केलेल्या अखंड ज्ञानसाधनेमुळे स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासा बरोबरच संपूर्ण समाजाचाही फायदा होतो.असे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या व शिक्षणाची बाग फुलवणाऱ्या शिवाजीराव भोसले यांचा जीवनपट म्हणजे प्राचार्य हि साहित्यकृती होय असे मत डॉ.संजय शिंदे यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात अंतर्गत उदगीर येथील दूध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या २४३ व्या वाचक संवादाचे पुष्प प्रा.डॉ.संजय शिंदे यांनी मिलिंद जोशी यांच्या प्राचार्य या साहित्यकृतीवर संवाद साधून गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर जाधव हे होते. यावेळी बोलताना डॉ. संजय शिंदे म्हणाले, प्राचार्य शिवाजीराव भोसले हे साहित्य व विचाराचे कृतिशील पूजक होते. एक तत्वज्ञ,विचारवंत, समाजसुधारक, विद्यार्थीप्रिय शिक्षक, उत्कृष्ट प्रशासक व वक्ते म्हणून शिवाजीराव भोसले यांनी कार्य केले.त्यांचा हा आदर्श नक्कीच समाजाला दिशा देईल. असे सांगत अनेक उदाहरणे देत शिवाजीराव भोसले यांचे संपूर्ण चरित्र त्यांनी उभे केले.
अध्यक्षीय समारोपात मुरलीधर जाधव म्हणाले, ध्येय उराशी बाळगून कार्य करणे काळाची गरज आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी चांगल्या लोकांचा सहवास महत्त्वाचा असतो. आज जो विषय मांडलेला आहे या विषयाची नितांत गरज आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबूराव सोमवंशी, बालाजी सुवर्णकार ,अनिल पततेवार आणि अनंत कदम यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रा.राजपाल पाटील यांनी केले तर आभार योगेश स्वामी यांनी मानले.